पुणे-सातारा मार्गावर 'डीएमयू' यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे- दौंडपाठोपाठ पुणे आणि सातारा या दोन शहरांना रेल्वेच्या लोकलसेवेने जोडण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने तयारी सुरू केली
आहे. त्यासाठी पुणे ते सातारा या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी "डीएमयू'ची (डिझेल मल्टिपल युनिट) चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.

पुणे - पुणे- दौंडपाठोपाठ पुणे आणि सातारा या दोन शहरांना रेल्वेच्या लोकलसेवेने जोडण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने तयारी सुरू केली
आहे. त्यासाठी पुणे ते सातारा या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी "डीएमयू'ची (डिझेल मल्टिपल युनिट) चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.

रेल्वे बोर्डाकडून पुणे विभागासाठी दोन "डीएमयू' दाखल झाल्या आहेत. तसेच, आणखी "डीएमयू' दाखल होण्याची शक्‍यता आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी पुणे-दौंड मार्गावर दोन वेळा यशस्वी चाचणी घेतली आहे.

त्यानंतर आता सातारा मार्गावर चाचणी घेण्यात आली, तीदेखील यशस्वी झाली. त्यामुळे या मार्गावरही लोकल (उपनगरीय) सेवा सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. पुणे स्टेशनवरून सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी डीएमयू साताऱ्यासाठी रवाना झाली. ती 12 वाजून 55 मिनिटांनी सातारा स्टेशनला पोहोचली. तर, तेथून पुन्हा एक वाजून 51 मिनिटांनी पुण्यासाठी रवाना होऊन सव्वासहा वाजता पुणे स्टेशनला दाखल झाली.

पुणे-सातारा मार्गावर वाठार, आदरकी, नीरा, लोणंद, वाल्हे, जेजुरी, सासवड रोड आदी मुख्य स्थानके आहेत. साताऱ्यासह या अन्य ठिकाणांवरून विविध कारणांनी पुण्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, सध्या त्यांच्याकडून रस्ते वाहतुकीचा अवलंब केला जातो. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा स्वस्त आणि सुलभ पर्याय म्हणून लोकलसेवेला पसंती मिळू शकते.

सध्या सातारा- पुणे ही एक पॅसेंजर कार्यान्वित आहे. ती पहाटे सव्वाचार वाजता साताऱ्याहून सुटते आणि सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी पुणे स्टेशनला दाखल होते. तीच गाडी पुणे स्टेशनवरून सायंकाळी पाच वाजून 10 मिनिटांनी सुटते आणि रात्री साडेदहा वाजता साताऱ्याला पोचते. मात्र, या गाडीची साताऱ्यावरून येण्याची वेळ प्रवाशांसाठी सोईस्कर नाही, त्यामुळे ही पॅसेंजर प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याची ठरत नाही, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.

Web Title: pune-satara route dmu success