Pune Schools : पुण्यातील शाळांत ‘आंतरराष्ट्रीय’ शिक्षण; परदेशातील संस्थांसमवेत करार

शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पुण्यातील विशेषत: खासगी शाळा देशाबाहेरील शिक्षण संस्थांशी करार करू लागल्या आहेत.
international education
international educationsakal

पुणे - रिद्धी सोळंकी (नाव बदललेले आहे) : ‘नमस्कार, मी रिद्धी, तुमच्याकडे शाळा कशी, शिक्षक कसे शिकवतात?’

एम्मा वॉल्टर (जर्मन मुलगी- नाव बदललेले आहे ) : ‘आमच्या शाळेत आम्हाला हवे ते शिकायला मिळते. उपक्रमशील आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जाते.’

पुण्यातील एका शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीचा जर्मनीतील एका गावामधील विद्यार्थिनीशी होणारा हा संवाद. विद्यापीठाचा एखाद्या परदेशी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार होण्याची प्रक्रिया आपल्यासाठी निश्चितच नवी नाही. परंतु आता शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पुण्यातील विशेषत: खासगी शाळा देशाबाहेरील शिक्षण संस्थांशी करार करू लागल्या आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, सांस्कृतिक-भाषिक देवाणघेवाण व्हावी, शिक्षकांना जागतिक स्तरावरील प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने पुण्यातील १५ ते २० टक्के शाळा अशाप्रकारे परदेशी संस्था, शाळा यांच्या समन्वयातून वििवध उपक्रम राबवित आहेत.

संवादातून वाढतेय ज्ञानदान

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचे अध्यक्ष सुभाष परमार म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांपासून शाळेत इंडो-ब्राझील, इंडो- साऊथ कोरिया, इंडो-इजिप्त, इंडो-फिलिपिन्स, इंडो-जर्मन हे विशेष उपक्रम आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थी आठवड्यातून एकदा परदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यातून भाषिक, सांस्कृतिक देवाण-घेवाण होतेच.

शिवाय भाषा, विज्ञान, गणित या विषयांतील ज्ञानदानही केले जाते.’ या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. इंग्रजीसह परदेशी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात. त्याशिवाय नाते दृढ निर्माण होते, असा अनुभवही परमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

परदेशी शिक्षणाचा मिळतो मार्ग

अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक समुपदेशन करण्यासाठी प्रियदर्शनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने थेट केंब्रिज विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. याबद्दल प्राचार्य डॉ. गायत्री जाधव म्हणाल्या, ‘शाळेत गेल्या तीन वर्षांपासून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिटिश कौन्सिलमार्फत शिक्षणासह सांस्कृतिक देवाणघेवाण करणारा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याचबरोबरच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशात जायचे असेल, तर विद्यापीठ कसे शोधावे, अर्ज कसा करावा, अशा पूर्वतयारीसंदर्भात केंब्रिज विद्यापीठाशी करार केला आहे.’

संवादातून वेगळी ऊर्जा

‘दरवर्षी एखाद्या वेगळ्या देशातील शाळेशी संपर्क साधायचा आणि तेथील शिक्षण पद्धती जाणून घेत शिक्षक-विद्यार्थी यांच्यात संवाद घडवून आणायचा, हे करताना वेगळी ऊर्जा मिळते,’ असे भुकूम कॅम्पसमधील संस्कृती शाळेच्या मुख्याध्यापिका दामिनी जोशी यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘ब्रिटिश कौन्सिलच्या इंटरनॅशनल डायमेंशन्स इन स्कूल’ (आयडीएस) या उपक्रमांतर्गत दरवर्षी वेगवेगळ्या देशांमधील शाळांसमवेत प्रकल्प राबविले जातात. त्यातून सांस्कृतिक, भाषिक, शिक्षण यावर आधारित देवाण-घेवाण होते. याशिवाय ग्योथ इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन यांच्यासमवेतही जर्मन भाषेच्या शिक्षणासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.’’

आंतरराष्ट्रीय संबंधांतून हे साध्य होतेय

शाळांच्या दृष्टिकोनातून

  • शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण

  • शिक्षण पद्धतीचे ज्ञान

  • तेथील शिक्षण पद्धतीनुसार शिकविण्यात बदल

  • विद्यार्थी-शिक्षक यांच्यात माहितीची देवाणघेवाण

  • विविध उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक साह्य

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून

  • परदेशी विद्यार्थ्यांच्या संवादातून आत्मविश्वासात वाढ

  • परदेशी भाषा शिकण्याचा मार्ग खुला

  • विविध देशांमधील संस्कृतीची माहिती

  • विज्ञान, गणित शिकविण्याचे रहस्य उलगडते

  • परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख

  • परदेशी अभ्यासाचा व्यवहारात उपयोग

इंग्रजी माध्यमाच्या आयबी, आयजीसीएसई अशा विविध मंडळांच्या शाळा आता विविध देशांमधील शिक्षण संस्थांशी सामंजस्य करार करत आहेत. ही गरज ओळखून नॅशनल इन्डिपेंडंट स्कूल्स अलायन्सच्या वतीने (निसा) राज्यातील खासगी शाळांसाठी केंब्रिज आणि फिनलंड शिक्षण पद्धतीवर विशेष उपक्रम राबविण्यात आले. केंब्रिजमध्ये पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रयोगावर आधारित शिक्षण दिले जाते.

विविध देशांतील शाळांत शिकविलेल्या अभ्यासाचा व्यवहारात होणारा उपयोग, हे शिक्षणातून सांगण्यावर भर दिला जातो. ही शिक्षण पद्धती आपल्याकडील शाळांमध्येही राबविण्यात यावी, यासाठी ‘निसा’तर्फे विविध कार्यशाळा, उपक्रम राबविले जात आहेत.

- राजेंद्र सिंह, उपाध्यक्ष, नॅशनल इनडिपेंडंट स्कूल्स अलायन्स (निसा)

खासगी शाळांची अंदाजे संख्या

महाराष्ट्र - ४३,७९९

पुणे - ३५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com