

पुणे, ता. १७ ः महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण केले जात आहे तसेच राज्यातील मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी जगली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारचे काय नियोजन आहे ? एकूणच शाळा व शिक्षणाच्या बाबतीत या सरकारची भूमिका अतिशय उदासीन आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणाच्या समस्येवरून महापालिकेसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
बारामती लोकसभा मतदार संघ व पुणे शहरातील विविध समस्यांसंदर्भात सुळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे. फुरसुंगी येथील कचरा डेपो संदर्भात आजही तेथे आंदोलन सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा पडून आहे. समाविष्ट गावांमधील मिळकतकराचा प्रश्न कायम आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी संबंधित मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली होती, त्यास पुढे मुदतवाढ देण्यात आली. मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. या गावांवर झालेला हा अन्याय आहे. पवार यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय तसाच ठेवावा. कारण मूलभूत सोई-सुविधा दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उंड्री येथे कचरा, पाणी व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, त्याबाबत आयुक्त स्वतः पाहणी करून आढावा घेणार आहेत.’’
शहरातील नाले-ओढ्यांवरील बांधकामाबाबत सुळे म्हणाल्या, ‘‘बावधनमधील केतकी ओढ्यावर रस्ता बांधला आहे. पावसाळ्यात तिथे पूर येतो. तिथे हा रस्ता कोणी केला ? पीएमआरडीए किंवा महापालिका हे दोन्हीही सरकारचेच भाग आहेत. बावधनप्रमाणेच शहरात इतर ठिकाणी देखील ओढे-नाल्यांवर बांधकामे झाली असून तेथे पूरस्थिती उद्भवते. बहुतांश भागातील नाले बंद झाले आहेत. पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत.’’
---------------
धायरीला वीज का नाही?
राज्यात वीज अतिरिक्त आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे असताना धायरीमधील डीएसके विश्वला वीजपुरवठा का होत नाही? एक-दोन तास नव्हे, तर कित्येक तास तिथे वीज नसते. धायरीमधील रहिवासीही महापालिकेचा कर भरतात, मग त्यांना वीज का मिळत नाही, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
---------
वारज्यामध्ये वाहनांच्या रांगा
वारजे परिसरात केवळ ५०० मीटरच्या रस्त्याचे काम न झाल्याने दोन-दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा तेथे लागत आहेत. त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार आहे. महापालिका व राज्यात एकच सरकार सत्तेवर आहे. मग डबल इंजिन सरकार सत्तेवर असेल, तर पुण्यातील कामे का होत नाहीत ? कामे होत नसल्याने पुणेकरच भरडला जात आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा सामना करावा लागतो. भाजपच्या सात वर्षाच्या सत्तेमध्ये शहरीकरण पूर्णपणे कोलमडले असल्याची टीकाही त्यांनी केली.
----------------
सुळे म्हणाल्या,
- बालभारती- पौडफाटा रस्त्याला आपण विरोध केला
- विकास व पर्यावरणाचा समतोल टिकवूनच विकास व्हावा
- टेकड्या फोडणाऱ्यांविरुद्ध पक्ष म्हणून नव्हे, तर पुणेकर म्हणून आंदोलन करणार
- कचऱ्याचे टेंडर भूमीग्रीनला देणाऱ्या अदृश्य शक्तीचा शोध घेणार
- लोणावळा, भिवंडीतील दूषित पाण्यासंदर्भात अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठविणार
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.