esakal | Pune: शाळांनी मागविली पालकांची संमतीपत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

schools

पुणे : शाळांनी मागविली पालकांची संमतीपत्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत की नाहीत?, याची चाचपणी शहरातील शाळांनी सुरु केली आहे. यासाठी शाळांनी पालकांकडून संमतिपत्रे मागविली आहेत. या संमतिपत्रांचा कौल पाहून, येत्या चार ऑक्टोंबरला ऑफलाइन शाळा सुरु करायची की नाही?, याबाबतचा निर्णय संबंधित शाळा पातळीवर घेतला जाणार आहे. ग्रामीण भागातील शाळांनी मात्र सरकारच्या आदेशानुसार पुरेशी खबरदारी घेत, शाळा सुरु करण्याची तयारी केली आहे.

राज्यातील शाळा येत्या ४ ऑक्टोंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे सहा महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानुसार शहरातील इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंतचे आणि ग्रामीण भागातील पाचवीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी

पुणे शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्य सरकारने १६ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने २४ मार्च २०२० पासून केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउनची अंमलबजावणी केली. तेव्हापासून जानेवारी २०२१ पर्यंत सुमारे वर्षभर शाळा बंद होत्या. त्यानंतर जानेवारी २०२१ पासून सरकारच्या निर्णयानुसार काही भागांत माध्यमिक शाळा सुरू केल्या होत्या; परंतु मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने, पुन्हा आॅफलाइन शाळा बंद झाल्या होत्या.

शहरात सातवी, ग्रामीणमध्ये चौथीपर्यंतचे वर्ग बंदच

शहरातील इयत्ता सातवीपर्यंतचे तर, ग्रामीण भागातील इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग यापुढेही बंदच राहणार आहेत. हे सर्व वर्ग मागील सुमारे दीड वर्षापासून बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर आणि दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी केवळ आठवीपासूनचे वर्ग सुरु केले होते. याशिवाय ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुमारे दीड वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा सुरू होत आहेत.

हेही वाचा: अकोला : बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा; भाव पडले अन् मालही गेला

विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी

शाळेत पुरेसे अंतर राखणे

स्वच्छ मास्कचा वापर करणे

मास्कला सातत्याने हात न लावणे

सातत्याने हात धुणे

शाळेत येताना सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवणे

ग्रामीण भागातील पाचवीपासूनच्या सर्व शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे आॅफलाइन भरणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची संख्या ही शहराच्या तुलनेत अधिक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा दीड वर्षापासून बंद होत्या. त्यामुळे शाळा आणि शाळांची परिसर स्वच्छता करण्याचा आदेश ग्रामपंचायतींना दिला आहे.

- रणजित शिवतरे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

loading image
go to top