शिरूर बाजार समितीतील 'हल्लाबोल' अखेर शांत

भरत पचंगे
शनिवार, 31 मार्च 2018

शिक्रापूर: शिरूर बाजार समितीच्या संचालकांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या "हल्लाबोल'ची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी घेतली. त्यामुळे "हल्लाबोल'चे रूपांतर अखेर "गोडबोल'मध्ये झाले. त्यामुळे शुक्रवारी (ता. 30) मासिक बैठक खेळीमेळीत झाली, अशी माहिती सचिव दिलीप मैड यांनी दिली.

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीपासून ते सभापती- उपसभापतिपदावरून शिरूर व आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दरी पडलेली आहे. त्यातून आंबेगाव मतदारसंघातील बाजार समितीच्या दोन संचालकांना मासिक बैठकीच्या उपस्थितीबाबतच्या नियमाने बाद करण्याचे राजकारण शिजू लागले होते. याची कुणकूण लागताच या दोन्ही संचालकांनी आपली उपस्थिती मासिक बैठक रजिस्टरमध्ये दमदाटीने लावल्याची चर्चा झाली. त्यातून संस्थेतील सचिव व लेखापालाने हे प्रकरण थेट शिरूर पोलिस स्टेशनपर्यंत नेले.

एकीकडे पक्षाच्या राज्यभर गाजत असलेल्या हल्लाबोल आंदोलनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिरूर बाजार समितीच्या संचालकांचा एकमेकांवर "हल्लाबोल' सुरू झाला. त्यामुळे हे प्रकरण थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत पोचले. त्यानंतर बाजार समितीतील एका नवोदित संचालकाने या प्रकरणात मध्यस्थी करण्याची जबाबदारी आपण घेत नेते आणि पदाधिकाऱ्यांत शिष्टाई केली. त्यानुसार या प्रकरणावर पडदा टाकण्यापर्यंत हे प्रकरण आणले.

याबाबत सभापती शशिकांत दसगुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बैठकीबाबत कानावर हात ठेवले आणि आपण याबाबत काहीच बोलणार नसल्याचे सांगितले; तर संचालक मानसिंग पाचुंदकर यांनी नेत्यांच्या बैठकीबाबत बोलण्यापेक्षा सभापती दसगुडे काही बोलले तरच मी बोलेन, अशी भूमिका घेतली.

Web Title: pune shirur bajar samiti and politics