पुणे : 'ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनीचे चित्रीकरण

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे : कपड्याच्या दुकानातील 'ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनीचे चित्रीकरण करणाऱ्या कामगारास लष्कर पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान लष्कर पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात तत्काळ दोषारोपपत्र दाखल केले. 

पुणे : कपड्याच्या दुकानातील 'ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनीचे चित्रीकरण करणाऱ्या कामगारास लष्कर पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान लष्कर पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात तत्काळ दोषारोपपत्र दाखल केले. 

याप्रकरणी 25 वर्षीय विद्यार्थिनीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इम्रान झकीर पिरजादे (वय 21, रा. मीठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. नाताळसाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी त्या त्यांच्या तीन मैत्रीणींसमवेत पुण्यात आल्या होत्या. लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका कपड्याच्या दुकानामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. त्यांना पसंत पडलेले काही निवडक ड्रेस घेऊन ते बदलण्यासाठी दुकानातील "ट्रायल रूम'मध्ये गेल्या होत्या. कपडे बदलत असताना "ट्रायल रूम'च्या एका कोपऱ्यातून कोणीतरी मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत दुकानदार आणि लष्कर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी इम्रानला तत्काळ अटक केली. 

इम्रान हा संबंधित दुकानामध्ये दोन वर्षांपासून काम करत आहे. दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. दरम्यान त्याने "ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलणाऱ्या महिलेचे स्टुलवर उभा राहून मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा प्रकार केला. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण दुकानामध्ये कोठे छुपे कॅमेरे ठेवले आहेत का? याची तपासणी केली, तसेच इम्रानच्या मोबाईलमध्येही अन्य चित्रीकरण आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Pune: Shooting of a student changing in a trial room