पुणे देशातच नव्हे; जगातही स्मार्टच 

smart-pune
smart-pune

पुणे - देशांतर्गत "स्मार्ट सिटी' योजनेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराने आता जागतिक पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे. "स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ल्ड कॉंग्रेस' या उपक्रमात सहभागी झालेल्या 45 देशांतील 250 शहरांमधून अंतिम सहा शहरांच्या यादीत पुण्याने स्थान पटकावले आहे. 

बार्सिलोना येथे झालेल्या या स्पर्धेत तीन गटांमध्ये विविध देशांतील शहरांनी भाग घेतला होता. त्यामध्ये "प्रोजेक्‍ट' विभागात भुवनेश्‍वर आणि "सिटी' विभागात पुणे शहराने भाग घेतला होता. गुरुवारी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यामध्ये पहिला क्रमांक अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराने पटकावला 

आहे. उर्वरित पाच शहरांमध्ये कोरियातील सोल, नेदरलॅंडमधील हॉलंड, चीनमधील जिउक्वॉन आणि रशियातील मॉस्को शहरांसह भारतातील पुणे शहराला "फायनलिस्ट' म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत तीन महिन्यांपूर्वी देशांतर्गत स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या सर्व शहरांना पत्र पाठवून बार्सिलोनातील स्पर्धेत भाग घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुण्याचे प्रतिनिधित्व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले. 

पुणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील स्पर्धेत सहभागी झालेल्या जगातील अडीचशे शहरांपैकी पुणे शहराने सादर केलेला प्रस्ताव सरस ठरला आहे. शाश्‍वत विकास, जगण्यायोग्य शहर आणि नागरिकांचा लोकसहभाग या तीन निकषांवर पुण्याची निवड अंतिम सहा शहरांच्या यादीत करण्यात आली आहे. संपूर्ण शहराला लागू होतील असे शाश्‍वत पर्याय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम, तसेच एखाद्या भागासाठी असलेले शाश्‍वत पर्याय आणि त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने असलेले डिझाइन हे पुण्याच्या प्रस्तावाचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये योग्य संदेश जाण्यास मदत होईल आणि पुण्यातील प्रकल्पांसाठी निधी उभारणे सोपे होऊ शकेल. 

केंद्र सरकारने यापूर्वी देशांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत भुवनेश्‍वर शहराने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यापाठोपाठ अगदी थोड्या फरकाने पुण्याचा क्रमांक लागला होता. या स्पर्धेतही नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यात वाहतुकीचा प्रश्‍न प्राधान्याने हाताळण्याची गरज लोकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पुणे महापालिकेने पावले टाकत शहरातील स्टार्टअप्सलाही वाहतूकविषयक प्रकल्पांवर काम करण्याचे आणि प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कुमार यांनी केले होते. 

- जगभरातील 250 शहरांमधून पहिल्या सहा शहरांमध्ये पुण्याचा समावेश 

- जागतिक पातळीवरील सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा 

- आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, निधी उभारणीच्या दृष्टीने महत्त्व 

- लोकसहभाग, शाश्‍वत विकास हे मुद्दे ठरले सरस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com