
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तांबोळी यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी साहाय्यक समितीचे विश्वस्त, वसतिगृहाचे लोकप्रिय पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी (वय 88 वर्षे) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ते सुमारे 40 वर्षे सक्रिय होते. नगर येथील स्नेहालय व मैत्रेय फाउंडेशन, सह्याद्री हॉस्पिटल संचालित समवेदना, पंढरपूर येथील बालकाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी भरीव सामाजिक कार्य उभारले. अहमदनगर व बारामती येथील रिमांड होममध्येही त्यांनी सेवा केली.
गेली 60 वर्षे त्यांचे सेवाकार्य सुरु होते. दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने त्यांना गेल्या आठवड्यात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीनेही सोमवारी २ मे रोजी त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या निधनामुळे विद्यार्थी साहाय्यक समितीतील माजी विद्यार्थी, स्नेहालय, समवेदना आदी संस्थांना धक्का बसला आहे.
सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असलेले अधिकारी, प्रशासक, समन्वयक, पर्यवेक्षक, अधीक्षक अशा नानाविध भूमिका वठवत त्यांनी सर्व संस्था, उपक्रमांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बांधिलकी, समर्पण, कर्मनिष्ठा, कडक शिस्त, प्रेमभाव, पालकत्वाची भावना यामुळे तांबोळी सर विद्यार्थ्यांचा आधारवड होते.
Web Title: Pune Social Activist Ramakant Tamboli Died
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..