Pune: ठाकरे मार्ग जेव्हा गोखले मार्ग बनतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune thakare,Gokhale road map

Pune: ठाकरे मार्ग जेव्हा गोखले मार्ग बनतो; गुगल मॅप मध्ये ठाकरे पथ आता गोखले मार्ग दिसत आहे

कोथरुड- कोथरुड मधील संगितकार श्रीकांत ठाकरे पथ गुगल मॅपवरुन गायब होवून त्या जागी गोखले मार्ग दिसू लागला आहे.

गुगलस्नेही कोथरुडकरांना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. ठाकरे मार्ग गोखले मार्ग बनला कसा याची विचारणा करणारे निवेदन महानगरपालिका आयुक्त व पोलिसांना देवून कोथरुडकरांनी या घटनेचा निषेध केला आहे.

मनपात २००८ ला ठराव पास होवून संगितकार श्रीकांत ठाकरे पथाचे नामकरण झाले. कुमार परिसर, महेश विद्यालय, गांधीभवन व महात्मा सोसायटीकडे जाणारा हा रस्ता स्वच्छ, सुस्थितीतला व निवांतपणे फिरणारांचा आवडता आहे.

शहरात जी २० परिषदेचे आयोजन केल्यावर काही रस्त्यांचे सुशोभिकरण खाजगी मदतीतून करण्यात आले.

डीपी रस्त्याला जोडलेल्या श्रीकांत ठाकरे पथाला अशाच रीतीने सजवण्यात आले. अगोदरच चांगला असलेल्या या रस्त्यावर दोन दिवे व सुशोभित पानाचे शिल्प लावले म्हणजे रस्ता खाजगी मालकीचा झाला का ?

त्यामुळे रस्त्याचे नाव बदलले का असा प्रश्न माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी विचारला. गोरडे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व कोथरुड पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

गोरडे म्हणाले की, नाव समितीमध्ये रीतसर प्रस्ताव मान्य होवून पुणे महानगरपालिकेने या रस्त्यचे नामकरण संगितकार श्रीकांत ठाकरे पथ असे केले.

सर्वांना अंधारात ठेवून परस्पर नाव बदलण्यात आणण्याची ही कृती, महापालिका, जनता व ठाकरेंचाही अपमान करणारी आहे.

पुणे मनपाला ठाकरे या नावाचे वावडे आले आहे का. संबंधितांवर कठोर कायदेशिर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.