सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन; आमदार गायकवाड यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना १४ मार्चपासून बेमुदत संप सुरु केला आहे.

Pune Thalinad Agitation : सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन; आमदार गायकवाड यांचा निषेध

पुणे - राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप शनिवारी (ता. १८) पाचव्या दिवशीही चालूच होता. उद्या रविवारी सरकारी सुट्टी असली पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमधील सरकारी कर्मचारी आंदोलन विविध पद्धतीने करणार आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व कर्मचारी येत्या सोमवारी (ता.२०) थाळीनाद आंदोलन करणार आहेत. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांचा संप आणि कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवाय येत्या सोमवारी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे राज्य सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना १४ मार्चपासून बेमुदत संप सुरु केला आहे. या संपामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी (ता.१८) एका खासगी दूरचित्रवाणीशी बोलताना कर्मचाऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार गायकवाड यांचा तीव्र शब्दांत निषेध करत असून येत्या सोमवारी राज्यभर गायकवाड यांचा विविध मार्गांनी निषेध करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सन २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. तेव्हापासून कर्मचारी या ना त्या मार्गाने सातत्याने आंदोलन करत आहे. त्यामुळे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तिवेतन लागू करण्याबाबतचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. आता बेमुदत संप सुरु केल्यानंतर शुक्रवारी (ता.१७) केवळ त्या आश्‍वासनाची पूर्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर एकही कर्मचारी समाधानी नाही. त्यामुळे सरसकट सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत संप चालूच ठेवला जाणार असल्याचे विविध कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.