अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील गळती थांबेना

नितीन बिबवे 
शनिवार, 2 जून 2018

बिबवेवाडी - जनरेटरची अपुरी व्यवस्था, खिडक्‍यांच्या तुटलेल्या काचा, विजेअभावी बंद पडणारी वातानुकूलन यंत्रणा आणि स्वच्छता गृहांमधून होणारी पाणी गळती व अस्वच्छतेमुळे पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी येथे नाट्यगृह बांधले. परंतु तेथे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमच जास्त होतात. 

#PuneTheatre

बिबवेवाडी - जनरेटरची अपुरी व्यवस्था, खिडक्‍यांच्या तुटलेल्या काचा, विजेअभावी बंद पडणारी वातानुकूलन यंत्रणा आणि स्वच्छता गृहांमधून होणारी पाणी गळती व अस्वच्छतेमुळे पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी येथे नाट्यगृह बांधले. परंतु तेथे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमच जास्त होतात. 

#PuneTheatre

नाट्यगृह बांधल्यापासून स्वच्छतागृहांमधून होणारी पाण्याची गळती आजपर्यंत थांबलेली नाही. कलादालन व नाट्यगृहासाठी एकच जनरेटर सेट आहे. वीज गेल्यावर जनरेटरवर वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र वातानुकूलन यंत्रणा बंद राहते. छताच्या आतील बाजूचे काही दिवे बंद पडल्याने प्रेक्षकांना अंधारातच आसने शोधावी लागतात. महिलांच्या स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटले असून ते तारेने बांधले आहेत. स्वच्छतागृहाच्या काचा फुटल्या आहेत. वॉश बेसिनचे नळ तुटले असून आरसेही फुटले आहेत. साउंड सिस्टिम ठेवण्याच्या जागेत दगड-विटा ठेवल्या असून, तेथे घाणही साचते.

२१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी दोन कॅमेरे बंद आहेत. नाट्यगृहाचे वीजबिल दरमहा अडीच ते तीन लाख रुपये येते. त्या तुलनेत नाट्यगृहाला मिळणारे उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये एवढेच आहे. 

याबाबत कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ‘‘महापालिकेने उपनगरांमध्ये नाट्यगृहे बांधली. परंतु हा पांढरा हत्ती पोसणेच अवघड झाले आहे. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात एकच प्रयोग झाला. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहानंतर पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची आसनक्षमता भरपूर आहे. येरवडा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह बांधून पूर्ण झाले तरीही तेथे प्रयोग सुरू झाले नाहीत. याचे महापालिकेने नियोजन करायला हवे.’’

स्थानिक नागरिकांना विविध नाटकं पाहण्याचा आनंद मिळावा म्हणून नाट्यगृह बांधले. परंतु येथे नाटकांचे प्रयोग होत नाहीत. प्रामुख्याने सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन समारंभच जास्त होतात.
- रवींद्र होले, प्रेक्षक

पाणीगळतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सुरवातीला वॉर्डस्तरीय निधीची तरतूद केली होती. परंतु देखभाल-दुरुस्तीचा वार्षिक खर्च २५ ते ३० लाख रुपये येतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. 
- अनिल भोसले, व्यवस्थापक 

उद्याच्या अंकात - मालधक्का चौकातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन.

Web Title: Pune Theatre Issue annabhau sathe Theatre