esakal | Pune : तीन महिन्यांच्या बाळाची आईकडून सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : तीन महिन्यांच्या बाळाची आईकडून सुटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण त्याच्या आईनेच हाणून पाडले. परिचारिकेचा गणवेश परिधान करून आलेल्या महिलेने रिक्षातून बाळाचे अपहरण केले. मात्र बाळाच्या आईने रिक्षाचा पाठलाग करत त्याची सुखरूप सुटका करून ताब्यात घेतले.

वंदना मल्हारी जेठे (वय २४, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कासेवाडी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तिचे तीन महिन्यांचे बाळ श्‍वेता हिला घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास ससून रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली होती.

फिर्यादी महिला ससूनमधील वॉर्ड क्रमांक ७४ मध्ये थांबली होती. त्या वेळी परिचारिकेचा गणवेश परिधान केलेली महिला तिच्याकडे आली. तिने फिर्यादी महिलेस ‘तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, तुम्ही जा, मी बाळाला सांभाळते,’ असे संगितले. परिचारिका समजून फिर्यादीने त्यांच्या बाळाला तिच्याकडे विश्वासाने सोपविले. त्यानंतर त्या आपल्याला भेटण्यासाठी कोण आलंय हे पाहण्यासाठी गेल्या.

मात्र तेथे कोणीही नव्हते. त्यामुळे त्या तत्काळ वॉर्डमध्ये परतल्या. तेव्हा त्यांना संबंधित परिचारिका व त्यांची मुलगी तेथे आढळून आली नाही. अचानक घडलेल्या या घटनेनंतर फिर्यादीने हंबरडा फोडला. रुग्णालयाचे कर्मचारी व सुरक्षारक्ष तेथे धावून आले. रुग्णालय प्रशासनानेही तत्काळ बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. संबंधित महिला गृहिणी असून, तिच्या लग्नास सात वर्षे झाली आहेत. मात्र तिला अद्याप मूल झाले नाही. त्यामुळे तिने ससूनमधून बाळ पळवून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: शेतकऱ्यांवर आयातीची कुऱ्हाड

रिक्षावाल्याची ओळख आली कामी

फिर्यादी महिला प्रवास करत असलेल्या रिक्षाचालकाचा बाळ पळवून नेणारा रिक्षाचालक ओळखीचा होता. त्यामुळे त्याने संबंधित महिलेस बोलण्यात गुंतवून रिक्षा हळूहळू नेण्यास सांगितले. त्यानुसार पुढील रिक्षाचालकानेही त्याची रिक्षा संथगतीने घेऊन अप्रत्यक्षरीत्या मदतीचा हात दिला.

आणि तिच्यातील आईने घेतले रौद्ररूप!

फिर्यादी महिलेने या घटनेनंतर तत्काळ रुग्णालयाबाहेर येऊन बाळ घेऊन पळालेल्या महिलेच्या रिक्षाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी महिलेने मोबाईलवरून तिच्या नातेवाइकांना घडलेली घटना सांगितल्याने नातेवाईकही सतर्क होऊन तिच्या मदतीसाठी धावले. दरम्यान, एक ते दोन तास हा पाठलाग सुरू असताना संबंधित रिक्षा चंदननगर येथे पकडली. तिच्याकडील बाळाला ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला.

बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक वंदना सपकाळे व त्यांच्या पथकाने या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, ससून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

loading image
go to top