esakal | शेतकऱ्यांवर आयातीची कुऱ्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

शेतकऱ्यांवर आयातीची कुऱ्हाड

sakal_logo
By
संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोयामीलच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारने तूर आणि उडीद या डाळींची आयात केली आहे. मलावी देशाकडून पन्नास हजार टन तूर येणार आहे; तर म्यानमारकडून एक लाख टन तूर आणि अडीच लाख टन उडीद मागविण्यात आले आहे. नेमकी स्थानिक शेतकऱ्यांची तूर व उडीद बाजारात येतानाच आयात मालाने बाजारपेठ भरून जाणार आहे. परिणामी सोयाबीनपाठोपाठ आता उडीद व तूर उत्पादकांनाही आयातीची झळ बसणार आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत दरवर्षी अशीच आयात होणार आहे.

हेही वाचा: कोरोनात मृत्यू झालेले ६३कर्मचारी अद्याप मदतीविना

भारताने २४ जून २०२१ रोजी म्यानमार व मलावी या देशांसमवेत पंचवार्षिक सामंजस्य करार (एमओयु) केला आहे. त्यानुसार सन २०२१-२२ ते सन २०२५-२६ अशी पाच वर्ष खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आयात होणार आहे. याबाबतची अधिसूचना विदेश व्यापार महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार दरवर्षी मलावी देशाकडून पन्नास हजार टन तूर; तर म्यानमारकडून एक लाख टन तूर व अडीच लाख टन उडीद एवढा शेतमाल आयात होणार आहे. चेन्नई, मुंबई, कलकत्ता, हाजिरा, तुतिकोरीन या बंदरावर आयात होणार आहे. परिणामी स्थानिक शेतकऱ्याला पाच वर्ष याची झळ बसणार आहे.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

"आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था सरकारने केली आहे. एकीकडे प्रोत्साहनाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आयात करून कंबरडे मोडायचे, ही प्रथाच पडली आहे. महिनाभरात आमचा माल बाजारात यायला सुरुवात होईल, तेव्हा नक्कीच या आयातीमुळे आधारभूत किमतीसद्धा मिळणार नाहीत, ही भीती आहे. विशेषतः सोयामील, तूर, उडीद या आयातीने मराठवाडा, विदर्भातला शेतकरी मारला जाणार आहे."

- कालिदास आपेट, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना

हेही वाचा: शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

भावात होणार घट

एकीकडे तेलबिया आणि डाळींच्या लागवडीसाठी केंद्र सरकार प्रोत्साहन दिल्याच्या घोषणा करत आहे आणि दुसरीकडे डाळी आणि तेलबियांची जोरदार आयात सुरू आहे. सध्या आवक अद्याप सुरू झालेली नसताना तूर सरासरी ६७०० रुपये प्रतिक्विंटल, तर उडीद ६८०० रुपये प्रतिक्विंटल, असा दर आहे. आवक सुरू झाल्यावर हे दर आणखी खाली येणार असतात. आवक सुरू होतानाच दीड लाख टन तूर आणि अडीच लाख टन उडीद बाजारपेठेत आयात होऊन आला; तर बाजारपेठेवर दडपण येऊन भावात आणखी घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

अशी होणार आयात...

  • मलावी - ५० हजार टन तूर

  • म्यानमार - १ लाख टन तूर ; अडीच लाख टन उडीद

loading image
go to top