
Pune News: बाह्यवळण मार्गावर अंगातून घामाच्या धारा त्रासलो बाबा...
उंड्री : अरुंद रस्ता, वाहनांची खच्चून गर्दी, उन्हाच्या झळया, पत्र्याची केबिन तापलेली, अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढा कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर वाहने चालविणाऱ्या ट्रकचालकांनी व्यक्त केली.
रस्ते विभागाने कात्रज बायपास महामार्गावर रखडलेले रुंदीकरण, रस्त्यालगत विद्युत खांब हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, असे सांगून घसा कोरडा झाला. मात्र प्रशासनाला काही जाग येत नाही, अशी व्यथा वाहनचालकांनी मांडली.
ट्रकचालक अवदेश पांडे, शैलेंद्र दुबे म्हणाले की, बाह्यवळण महामार्गावर गावांच्या ठिकाणी गतिरोधकांबरोबर स्थानिकांच्या वाहनांची घुसखोरी, दमबाजीमुळे ड्रायव्हर म्हणून नोकरी करायलाच नको असे झाले आहे.
वाहतूककोंडी झाली की, महामार्गालगतच्या गावातील वाहनचालक अचानक पुढे येतात आणि दमबाजी करतात.
उन्हामुळे गाडीच्या केबिनचा पत्रा तापतो, अंगातून घामाच्या धारा सुरू असतात, वाहतूककोंडीतून सावरत असतानाच पोलीस येतात, एखाद्या खासगी बस किंवा रिक्षाचालकाने चालकाने चार-दोन प्रवासी घेतले की, पोलीस धारेवर धरतात, कागदपत्रे दाखवण्यासाठी वाहन बाजूला घ्यावे लागते.
वाहन उभे करण्यासाठी जागा नसते, कागदपत्रामध्ये काही त्रुटी असो की नसो, भली मोठी दंडाची रक्कम सांगितली की जीव नकोसा होतो, अशी तक्रार वाहनचालकांनी केली.
खचलेल्या साईडपट्ट्या, चेंबर खाली रस्ता वर तर काही ठिकाणी चेंबर वर रस्ता खाली आणि खड्ड्यांच्या गर्दीमुळे वाहनांचा मेन्टेन्स वाढू लागला आहे, अॅव्हरेज कमी मिळते, उन्हामुळे वाहने गरम होतात, खड्ड्यांमुळे पाठीचा मणक्याचा त्रास वाढला आहे, ट्रक आणि बसला धडीचे काम निघते, टायर चिरतात, पायाला त्रास होतो.
वाहतूककोंडीमध्ये सतत स्टेअरिंग फिरवावी लागत असल्याने हात भरून येतात. बससाठी तीन, सहा आणि एक वर्षासाठी रोड टॅक्स भरावा लागतो.
सचिन कदम, ट्रकचालक
दहावीच्या परीक्षा आणि शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळी उंड्री-पिसोळी आणि परिसरातील रस्त्यावर धावणाऱ्या पाण्याच्या टँकरमुळे वाहतूककोंडी होते. प्रशासनाने शाळा आणि परीक्षांच्या वेळेत टँकरला बंदी घातली तर वाहतूक सुरळी होण्यास मदत होईल.
शंकर मिसेकर, स्कूल बसचालक
दरम्यान, बारावीच्या परीक्षेला पालक-विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता यावे यासाठी वाहतुकीचे नियोजन केले होते. तेच नियोजन आता दहावीच्या परीक्षार्थींना असणार आहे.
सकाळी 9 वाजल्यापासून वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. त्यातूनही वाहतुकीविषयी कोणालाही, काहीही अडचण आली, तर त्वरित वाहतूक पोलिसांशी संपर्क साधावा.
बालाजी साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, हांडेवाडी वाहतूक शाखा