
Traffic Jam : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी झाली असून नांदेड फाटा व खडकवासला या दोन्ही बाजूंकडे सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला आहे मात्र वाहन चालक त्यांच्याशीच अरेरावी करताना दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलीस मात्र दिसत नाहीत.
शनिवारची सुट्टी असल्याने पर्यटकांच्या वाहनांची संख्या जास्त आहे. किरकटवाडी फाट्याजवळ किरकटवाडी गावातून येणारी वाहने, नांदेड फाट्याकडून येणारी वाहने व खडकवासला बाजूकडून जाणारी वाहने एकत्र आल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. रस्ता अरुंद असल्याने व अनेक वाहनचालकांनी बेशिस्तपणे मधे वाहने घातल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सुमारे एक किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना पोलीस मात्र कुठेही दिसले नाहीत. नरेंद्र हगवणे, संदीप हगवणे, खुशाल करंजावणे, सचिन तिखे, सुनील जाधव, जिग्नेश माळी या तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाहन चालक व स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्याशी संपर्क साधला असता वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस पाठवले जातील अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.