#PuneTraffic : वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुणेकरांनो बोलते व्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पावसाने झोडपले, खड्ड्यांनी सतावले, कोंडीने अडविले, पोलिसांनी फटकारले असे अनुभव रोजच पुणेकर घेतात... आता वाहतुकीच्या कोंडीबाबत पुणेकरांनीच आवाज उठविला पाहिजे, तर मग सांगा तुमचा अनुभव 'सकाळला' 9021233264, 9527866904, 9881099029, 8888847880 (सकाळी 10 ते दुपारी 12), 9130088459 (व्हॉट्सअॅप)

पावसाने झोडपले, खड्ड्यांनी सतावले, कोंडीने अडविले, पोलिसांनी फटकारले असे अनुभव रोजच पुणेकर घेतात... आता वाहतुकीच्या कोंडीबाबत पुणेकरांनीच आवाज उठविला पाहिजे, तर मग सांगा तुमचा अनुभव 'सकाळला' 9021233264, 9527866904, 9881099029, 8888847880 (सकाळी 10 ते दुपारी 12), 9130088459 (व्हॉट्सअॅप)

वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुटी देण्याची वेळ आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वाघोलीकरांची कोंडीतून सुटका करण्यासाठी 60 ते 70 स्वयंसेवकांची मदत घेण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे. वाघेश्‍वर मंदिर ते बी. जे. एस. महाविद्यालयाच्या दरम्यान कोंडीचे सहा ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून, तेथे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

सततच्या वाहतूक कोंडीने वाघोलीकर हैराण झाले आहेत. सोमवारी तर कोंडीने कहरच केला. यामुळे येथील लेक्‍सिकॉन शाळेने विद्यार्थ्यांना सुटी दिली. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली. त्यामुळे पोलिस यंत्रणेनेही तत्काळ दखल घेऊन कोंडीवर उपाय योजना हाती घेतल्या आहेत. 

लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, ""वाघेश्वर मंदिर ते बी. जे. एस. महाविद्यालयदरम्यान सहा "स्पॉट' निश्‍चित केले असून, तेथे वाहतूक नियंत्रणासाठी 60 ते 70 स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. सकाळी सात ते बारा, बारा ते पाच व सायंकाळी पाच ते दहादरम्यान हे स्वयंसेवक काम करतील. स्वयंसेवक देणाऱ्या संस्थांबरोबर चर्चा सुरू आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येईल. तसेच, तिन्ही चौकांतील वाहतूक नियंत्रण दिवे सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे दिवे सुरू होतील. वाहतूक कोंडी होणार नाही, याच दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे.'' 

"पीएमआरडीए' उदासीन 
कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (पीएमआरडीए), सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग, ग्रामपंचायत व लोणीकंद पोलीस या सर्व विभागांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या कोंडी सोडविण्याचा सर्व भार केवळ लोणीकंद पोलिसांवर आहे. ते प्रयत्न करतात; मात्र अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे त्यांचे प्रयत्न कमी पडतात. पीएमआरडीए व बांधकाम विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसते. 

कोंडीची प्रमुख ठिकाणे
वाघेश्वर मंदिर चौक, फडई चौक, 
आव्हाळवाडी फाटा चौक, केसनंद फाटा चौक, भावडी चौक, 
बी. जे. एस. महाविद्यालय चौक 

खडी टाकली
आव्हाळवाडी चौकात साईड रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. ग्रामपंचायतीने तेथे खडी टाकली आहे. 

वाघेश्‍वर मंदिर परिसरातील सिग्नल तीन दिवसांत सुरू करणार असल्याची उपसरपंच संदीप सातव यांची माहिती.

Web Title: Pune Traffic wagholi Traffic sloved Volunteer