esakal | पुणे : बालेवाडीत रेमडेसिव्हीरची बेकायदा विक्री करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पुणे : बालेवाडीत रेमडेसिव्हीरची बेकायदा विक्री करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्‍शनची बेकायदा विक्री करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही करवाई केली असून आरोपींकडून दोन इंजेक्‍शन व दुचाकी जप्त केली आहे. बालेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप देवदत्त लाटे (वय 25), संदीप देवदत्त लाटे (वय 23, दोघेही सध्या रा. मोझे महाविद्यालयाजवळ, बालेवाडी, मूळ रा. बेलुरा, बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपींविरुद्ध औषध किंमत नियंत्रण आदेश, जीवनावश्‍यक वस्तु आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पिंपरी : चिखलीत संचारबंदी दरम्यान दुकानं खुली; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

बालेवाडी परिसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन पंचवीस हजार रुपयांना विक्री करत असल्याची खबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने बालेवाडी परिसरात सापळा रचला आणि येथे दुचाकीवर थांबलेल्या प्रदीप लाटे या व्यक्तीकडे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. यावेळी प्रदीप लाटेला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ संदीप लाटे हा देखील या कृत्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे, पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: कोरोना टेस्ट केलीये? रिपार्ट मिळाला नाही? मग, निरामयमध्ये राहा!

असा सुरु होता काळाबाजार

प्रदीप लाटे हा अभियंता आहे, तर संदिप लाटे हा औषधनिर्माण कंपनीमध्ये कामाला होता. मात्र, सध्या तो नोकरीला नव्हता. दोघेही मागील महिन्यांपासून रेमडेसिव्हीरची गरज असणाऱ्या नागरीकांची माहिती फेसबुकवरून मागवत. त्यानंतर त्यांच्याकडून डॉक्‍टरांचे प्रिस्क्रीपश्‍न घेऊन मेडीकलमधून 1,200 रुपयांना इंजेक्‍शन विकत घेत. त्यानंतर सुरूवातीला 5 ते 10 हजारांना ते इंजेक्‍शन विकत मात्र आता या इंजेक्शनचा तुटवडा असल्यानं त्यांनी याची थेट 25 हजार रुपयांना विक्री सुरु केली होती.

...तर पोलिसांना माहिती कळवा

शहरात रेमडेसिव्हीर या इंजेक्‍शनची काळ्याबाजारात विक्री होत असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ इंजेक्‍शन जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी पोलिसांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहकार्य मिळत आहे. रेमडेसिवीर इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरीकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.