पुणे : माणसाच्या त्या दोन पिल्लांच रक्षण कुत्र्यांनी केलं!

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 जानेवारी 2020

दोन्ही बाळांना गरम पाण्यानं स्वच्छ पुरसं. जवळच राहणाऱ्या श्रीदेवी सुतार यांनी त्या बाळांना टोपडं घालतं. दूध दिलं.

पुणे : प्रसूतीनंतर डॉक्‍टरांनी अर्भकांची नाळ तोडली पण, त्या नाळेबरोबरच त्या जन्मदातीनं त्यांच्याशी असलेलं मातृत्वाचं नातंही तोडलं. जगात येऊन अवघे चार-पाच दिवस झालेल्या त्या चिमुकल्या हाड-मासाच्या गोळ्यांना पाषाण तलावाजवळील कचरा कुंडीत ठेवलं. पण, त्या माणसाच्या "पिल्लांच' रक्षण तेथील कुत्र्यांनी केलं! त्यानंतर कोणतंही रक्ताचं नातं नसलेल्या त्या जिवांना पाषाणमधील महिलांना पुढं येऊन मायेनं झबलं-टोपडं दिलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेव्हा कुत्र्यांचं भुंकणं थांबलं 
पाषाण तलावाच्या प्रवेशद्वारासमोरील कचरा कुंडीजवळ कुत्री जोरजोरात भुंकत होती. कचरा कुंडीकडे येणाऱ्यांकडे ती रोखून बघत भुंकत असल्याचे दिसले. कुत्री भुंकण्याच काही क्षण थांबलं आणि जिवाच्या आकांताने रडणाऱ्या एका लहान मुलाचा आवाज आला. या मुलांना सर्वप्रथम पाहणारे पाषाण तलावाचे सुरक्षा रक्षक सुनील शंकर ढोरे "सकाळ'शी बोलत होते. ते म्हणाले, ""कचरा कुंडीजवळ गादी टाकली होती. त्यावर अंथरलेल्या एका शॉलीमध्ये बाळाला गुंडाळलं होतं. सुरवातीला एकच बाळ आहे असं वाटलं. पण, त्याच्या खाली दुसरं तितकंच गोंडस बाळ दिसलं. एक मुलगी आणि दुसरा मुलगा होता. आम्ही त्या बाळांना प्रेमाने हातात घेतल्यावर कुत्र्याचं भुंकण थांबलं. काही तासांपूर्वीच जन्मलेली ती बाळे आहेत, हे स्पष्ट दिसतं होतं. त्यांना गरम पाण्यानं स्वच्छ पुरसं. जवळच राहणाऱ्या श्रीदेवी सुतार यांनी त्या बाळांना टोपडं घालतं. दूध दिलं. या दरम्यान 108 या आपत्कालीन रुग्णसेवेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

बेंबीला क्‍लिप तशीच 
बाळांना वैद्यकीय मदत देणाऱ्या 108 रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता नरोळे म्हणाल्या, 'दोन नवजात अर्भके कोणीतरी कचराकुंडीत टाकली असल्याची माहिती कळाली. रुग्णवाहिकेसह सकाळी नऊ वाजता घटनास्थळी आमचे पथक पोचले. आपल्या घरातील बाळ असल्याप्रमाणे तेथील स्थानिक नागरिकांनी त्या बाळांना टोपडं घातलं होते. हात आणि पायांना मोजे घातले. दोन उबदार ब्लॅंकेटमध्ये त्यांना मायेने गुंडाळले होते. प्रसूती झाल्यानंतर आईची बाळाशी असलेली नाळ तोडली जाते. त्यामुळे नाळ असलेल्या ठिकाणी बेंबीला क्‍लिप लावतात. त्या क्‍लिपा दोन्ही बाळांच्या जसाच्या तशा होत्या. त्यामुळे ही बाळे जुळे असतील अशी शक्‍यता वाटली. त्यामुळे या दोन्ही बाळांना घेऊन आम्ही थेट ससून रुग्णालयातील नवजात अर्भक विभाग गाठला. तेथे त्यांना दाखल केले.' बालरोग तज्ज्ञ डॉ. छाया वळवी, 'रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यातील मुलगा 2.40 किलोग्रॅमचे तर, मुलगी 1.97 किलोग्रॅम वजनाचा आहे. ही दोन्ही मुलांची प्रकृती आता स्थिर आहे.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

ससून रुग्णालयातील मातृदुग्ध पेढीमुळे या नवजात बालकांना त्यांच्या हक्काचं मातेचं दूध मिळालं आहे. त्याचा फायदा या अर्भकांना होईल. या दूधामुळे जंतूसंसर्ग कमी होऊन बाळांचं वजन वाढेल. त्याच्या भविष्यातील प्रगतीसाठीही हे महत्त्व ठरेल.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune two newborn babies found at pashan lake