Pune : निमगाव म्हाळुंगीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कोपरगाव येथे झालेल्या विभागीय पातळीवरील स्पर्धेतून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली
Pune
Pune sakal

तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, विद्या विकास मंदिर माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कोपरगाव येथे झालेल्या विभागीय पातळीवरील स्पर्धेतून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र लीग बेसबॉल असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे, सचिव कांतीलाल टाकळकर, दशरथ लांडगे, काकासाहेब करपे,माजी सरपंच राजेंद्र विधाटे, प्राचार्य संजीव मांढरे व ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन करून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील रविराज युवराज शेळके आणि पवन बालम विधाटे या दोन खेळाडूंनी शिरूर तालुका संघातर्फे कोपरगाव येथे झालेल्या विभागीय पातळीवरील बेसबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करून विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत शिरूर स्पोर्ट क्लब या संघाने चाळीसगाव संघावर १३ - २ गुणांनी विजय मिळवला आहे. रविराज शेळके व पवन विधाटे या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रमेश करपे यांनी मार्गदर्शन केले आहे.

दिल्ली येथे होणारी एम.एल.बी. कप ऑफ इंडिया- २०२२ ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा १ ते ५ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत रविराज शेळके आणि पवन विधाटे हे दोन खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून खेळणार असल्याचे प्राचार्य संजीव मांढरे यांनी सांगितले.

दरम्यान, "यापूर्वी शिक्षण संस्थेच्या श्रीमती बबईताई टाकळकर आश्रमशाळेतील २००७ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शशिकला बिडगर या मुलीने ३२ किलो वजन गटात सुवर्णपदक तसेच २०१० मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कविता सोलनकर हिने ३४ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे."

"आजही निमगाव म्हाळुंगीच्या शिक्षण संस्थेतील विद्यालयातील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून क्रीडा क्षेत्रात आपले नाव चमकवले आहे. यापूर्वीही आश्रम शाळेतील भटक्या विमुक्तांच्या मुलींनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. कुस्ती प्रशिक्षक झेंडू पवार व इतर मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेली खेळाची मेहनत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी यश मिळवून देणारी ठरली आहे. आगामी काळातही संस्थेतील विविध विद्यालयातील खेळाडूंना मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकामार्फत विशेष प्रोत्साहन देण्यात येईल असे मत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com