पुणे विद्यापीठातील गैरव्यवहारप्रकरणी अखेर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

- पुणे विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल 
- साडे तीन लाखांचा गैरव्यवहार
- चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा व शिका या योजनेमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नावे व कागदपत्रे देऊन त्याद्वारे साडे तीन लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे विद्यापीठाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी अखेर तिघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिन्ही व्यक्ती योजनेच्या समन्वयक आहे. 

अमोल भानुदास मगर (रा. गारवाड, माळशिरस, सोलापुर), सागर तानाजी काळे (रा.पळसदेव, इंदापुर), किरण गायकवाड (रा.मुढोळ, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन समन्वयकांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ.प्रभाकर देसाई (वय 43, रा.शिक्षक निवास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी मधील एका 43 वर्षीय प्राध्यापकाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये कमवा व शिका योजनेमध्ये गैरव्यवहार झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ.देसाई हे पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक आहेत. डॉ.देसाई यांच्याकडेच काही वर्षांपासून "कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका' या योजनेची जबाबदारी आहे. दरम्यान, या योजनेमध्ये समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या मगर, काळे व गायकवाड या तिघांनी संगनमत करुन नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नावे व कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर करुन, संबंधीत विद्यार्थ्यांच्या नावावर येणारे "कमवा व शिका' योजनेचे पैसे स्वतःच्या बॅंक खात्यामध्ये वळवून घेतले. तसेच काही विद्यार्थी कमवा व शिका योजनेमध्ये काम करीत नसतानाही त्यांना कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी दाखवुन त्यांच्याही बॅंक खात्यावर पैसे टाकून, पुन्हा ते पैसे रोख स्वरुपात स्वतः काढून घेतल्याचे उघडकीस आले.

मगर, काळे व गायकवाड या तिघांनी अशा पद्धतीने दोन वर्षात विद्यापीठाची तब्बल साडे तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी डॉ. देसाई यांनी तिघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Universities Kamva And Shika Scheme Frauds case has been registered