फिनलॅंडच्या टुर्कू विद्यापीठाशी पुणे विद्यापीठाचा सहकार्य करार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

काय होणार फायदे? 

  • विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टुर्कू विद्यापीठ मिळून युरोपीय युनियन व संस्था/संघटनांकडून निधी मिळविण्यासाठी संयुक्त प्रस्ताव दाखल करू शकतील.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नव्या शिक्षण धोरणांतर्गत सुरू करावयाच्या नवनवीन अभ्यासक्रमांची रचना करण्यास उपयोग होईल.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिनलॅंडच्या टुर्कू विद्यापीठाशी अध्यापन व संशोधन, विद्यार्थी व अध्यापक आदान-प्रदान, संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रकल्प, कमी कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच अभ्यासक्रम विकसित करण्यासंबंधी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सहमतीपत्रावर दोन्ही विद्यापीठांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

फिनलॅंड हा देश आधुनिक शिक्षणपद्धतीसाठी जगप्रसिद्ध आहे. ते सुमारे शंभर वर्षे जुने विद्यापीठ आहे. टुर्कू हे फिनलॅंडमधील आघाडीचे विद्यापीठ असून, विविध विद्याशाखीय दर्जेदार संशोधनासाठी ओळखले जाते. 

या विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने गेल्या वर्षी पुणे विद्यापीठाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी अध्यापन व संशोधन क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा : हजाराची नोट येणार, दोन हजारांची जाणार ?

विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) शैक्षणिक व संशोधनातील भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्पार्क’ नावाची योजना आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टुर्कू विद्यापीठात बायोसायन्सेस विषयात संशोधन सुरू आहे. याशिवाय, पुणे विद्यापीठाचे काही विद्यार्थी टुर्कू विद्यापीठात पीएच. डी. किंवा पीएच. डी.नंतरचे संशोधन करीत आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

‘टुर्कू’च्या शिष्टमंडळाची भेट
टुर्कू विद्यापीठाचे व्हाइस-रेक्‍टर प्रा. काले-अन्ती सुओमिनेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाला भेट दिली. त्यात सहकार्याबाबत सहमती पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुणे विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्वाक्षरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Cooperation Agreement with Turku University of Finland