
तुम्ही नोकरी, व्यवसायाची कामे गतीने व्हावीत, म्हणून कर्ज काढून लाखभर रुपये किमतीची, चांगल्या कंपनीची दुचाकी घेता. एखाद्या दिवशी रस्त्याच्याकडेला कुठेतरी गाडी लावून जाता. याच संधीची वाट पाहणारे दुचाकीचोर क्षणार्धात तुमची गाडी घेऊन पळून जातात.
पुण्यात आता बाईकला कुलूप लावलेच पाहिजे!
गाडीच्या कुलपासाठी खर्च कराच
पुणे - तुम्ही नोकरी, व्यवसायाची कामे गतीने व्हावीत, म्हणून कर्ज काढून लाखभर रुपये किमतीची, चांगल्या कंपनीची दुचाकी घेता. एखाद्या दिवशी रस्त्याच्याकडेला कुठेतरी गाडी लावून जाता. याच संधीची वाट पाहणारे दुचाकीचोर क्षणार्धात तुमची गाडी घेऊन पळून जातात. पण, त्याअगोदर तुम्ही लाखाच्या गाडीला चांगल्या दर्जाचे हॅंडल लॉक किंवा चारशे-पाचशे रुपयांचे एखादे जादा कुलूप (यू-लॉक) लावले असते तर! वाहनचालकांच्या अशा उदासीनतेमुळे तीन वर्षांत शहरातून तब्बल चार हजार ६२३ दुचाकी-चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. त्यापैकी एक हजार ५३२ वाहने पोलिसांना मिळाली, उर्वरित तीन हजार ९१ वाहने अजूनही सापडली नाहीत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिसांची उदासीनता
चोरीला गेलेल्या वाहनांबाबत नागरिक पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देतात. मात्र, पोलिस ठाण्यांमधील उदासीनतेमुळे कित्येक वर्ष उलटूनही वाहनचोरीचे गुन्हे उघड होत नाहीत. परिणामी, चालक वाहन पुन्हा मिळण्याची आशा सोडून देतात. तर दुसरीकडे गुन्हे शाखा, वाहनचोरी व दरोडा पथक किंवा काही मोजक्याच पोलिस ठाण्यांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. अनेकदा घरफोडीच्या किंवा अन्य गुन्ह्यातील आरोपीच वाहनचोर निघतात.
घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख
काही हॅँडललॉक कमजोरच
नामांकित दुचाकी वाहन कंपन्यांकडून विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. परंतु, वाहन चोरीला जाऊ नये, यासाठी चांगल्या दर्जाचे हॅँडललॉक किंवा अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जात नाही. परिणामी, चोरट्यांकडून काही कंपन्यांच्या दुचाकींची नाजूक लॉक सिस्टीम सहजरित्या तोडून वाहने चोरली जातात.
चोरीच्या वाहनांचे होते काय?
चोरट्यांच्या काही टोळ्या केवळ चोरीच्या उद्देशाने दुचाकी-चारचाकी वाहने चोरतात. दोन-चार ठिकाणी चोरीच्या, अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये संबंधित वाहनांचा वापर झाला की, ते वाहन रस्त्यातच बेवारसपणे सोडून दिले जाते. काही ‘प्रोफेशनल चोर’ त्या गाड्यांच्या नंबर प्लेट बदलून, कागदपत्रे नंतर देतो असे सांगून ग्रामीण भागात १०-१५ हजारांत ती दुचाकी विकतात. काही बहाद्दर वाहनांची हेडलाईट, टाकी, टायर, इंजिनचे महागडे भाग वेगळे काढून त्याची विक्री करतात. तर काही अल्पवयीन मुलांकडून मौजमजा करण्यासाठी वाहनांची चोरी केली जाते.
जगण्याच्या लढाईला कोरोनाचे ग्रहण! वर्षभरानंतरही मजूरांना मिळेना रोजगार
वर्ष २०१८ २०१९ २०२०
चोरीला गेलेली वाहने १९६८ १६७८ ९७७
सापडलेली वाहने ६६७ ५४६ ३१९
न मिळालेली वाहने १३०१ ११३२ ६५८
जादा कुलूप अत्यावश्यक!
वाहनचोरीच्या घटनांचे मुळ कारण संबंधित वाहनाला जादा व चांगल्या दर्जाचे कुलूप नसणे हे एक आहे. वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे हॅँडललॉक चांगल्या दर्जाचे आहे का?, याची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच चारचाकी वाहनांप्रमाणे दुचाकीलाही ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यास किंवा ३०० ते ५०० रुपयांत मिळणारे पेट्रोल लॉक, यू लॉक वापरण्यास प्राधान्य द्यावे. विशेषतः ५० ते १०० रुपयांमध्ये मिळणारे वायरअप लॉक, लोखंडी साखळी किंवा या स्वरूपाचे कुलूप लावल्यासही वाहन चोरीला मर्यादा येऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सचिन वाझे-अंबानी प्रकरणाचा तपास बारामतीच्या IPS अधिकाऱ्याकडे
वाहनचालकांनी पार्किंग करताना चावी न विसरणे, चांगले हॅंडललॉक, जीपीएस यंत्रणा बसविल्यास वाहनचोरीच्या घटना कमी होतील. चोरीला गेलेल्या बहुतांश वाहनांचे नंबर बदलून बाहेरगावी नेली जातात. त्यामुळे वाहनचोरीचा तपास आव्हानात्मक ठरतो. तरीही पथकाने वाहनचोरी करणाऱ्या काही चोरट्यांसह अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
- शिल्पा चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहनचोरी व दरोडा पथक
रस्त्याच्या कडेला लावलेली माझी गाडी पर्वतीतून चोरीला गेली. त्यासंदर्भात फिर्याद दाखल केली. त्यास दोन वर्षे उलटूनही पोलिसांना अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
- किशोर शेलार, वाहनचालक
Edited By - Prashant Patil