गायक, कलाकारांसाठी व्हाइस केअर’ उपयुक्त - पंडित सुरेश तळवलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pandit suresh talwalkar

गायक आणि कलाकारांसाठी आवाज खूप महत्त्वाचा असतो. उत्कृष्ट गायक बनण्यासाठी गायकांचा आवाज हा चांगला असला पाहिजे.

Pune News : गायक, कलाकारांसाठी व्हाइस केअर’ उपयुक्त - पंडित सुरेश तळवलकर

पुणे - गायक आणि कलाकारांसाठी आवाज खूप महत्त्वाचा असतो. उत्कृष्ट गायक बनण्यासाठी गायकांचा आवाज हा चांगला असला पाहिजे. यासाठी सर्व गायकांनी आवाजाला जपले पाहिजे आणि हा आवाज जपण्यासाठी व्हाइस केअर हा ग्रंथ उपयुक्त ठरेल, असे मत पंडित सुरेश तळवलकर यांनी मंगळवारी (ता.२१) येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

पुण्यातील कान,नाक घसा तज्ज्ञ यांनी गायकांसाठी लिहिलेल्या व्हाइस केअर’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन आज पंडित सुरेश तळवलकर आणि प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या हस्ते स्वरदिंडी आणि ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात करण्यात आले. या समारंभात तळवलकर यांच्या हस्ते हरिहरन यांचा ‘स्वर गायत्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हरिहरन यांच्या आई व कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या ज्येष्ठ गायिका अलुमेलु मणी, पंडित विकास कशाळकर, प्रसिद्ध गायक डॉ. भारत बलवल्ली, प्रसिद्ध लेखक डॉ. अच्युत गोडबोले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पंडित प्रमोद मराठे आणि आणि व्हाइस केअर या ग्रंथाचे लेखक डॉ. मिलिंद भोई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंडित तळवलकर पुढे म्हणाले, ‘‘पुण्यातील प्रसिद्ध स्‍वरतज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेला हा ग्रंथ आणि गायक, कलाकार आणि व्याख्यात्यांच्या आवाजाचे आरोग्य जपण्यासाठी उत्पादित केलेल्या मेलो व्हाइस या आयुर्वेदिक गोळ्या उपयुक्त ठरणार आहेत. गायक, कलाकार आणि व्याख्यात्यांनी आवाजाच्या आरोग्यासाठी या दोन्ही बाबींचा उपयोग केला पाहिजे. गायक कलाकारांचे संगीतावर प्रेम असावे लागते आणि हे प्रेम आपल्या स्वतःच्या संगीतावर नव्हे तर, दुसऱ्यांच्या संगीतावर असले पाहिजे.’’

या समारंभात सुरेश तळवलकर आणि हरिहरन यांच्या हस्ते अशोककुमार सराफ, सचिन इटकर, आवेश व जमीर दरबार, हिंमतकुमार पंड्या, अनिल गोडे या सर्वांना स्वरगायत्री गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भोई प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पुण्यजागर प्रकल्पांतील निराधार मुलांना स्वरवाद्याचा संच भेट देण्यात आला. यावेळी अलुमेलु मणी, डॉ.अच्युत गोडबोले, पंडित विकास कशाळकर, रूपाली चाकणकर, डॉ. भारत बलवल्ली यांचेही भाषण झाले.

प्रारंभी डॉ. मिलिंद भोई यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात हा ग्रंथ लिहिण्यामागचा उद्देश सांगितला. डॉ. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले. प्रकाशन समारंभानंतर इक्बाल दरबार प्रस्तुत आॅर्क्रेस्ट्रा गॉड गिफ्ट’ सादर करण्यात आला.

आई हीच माझी गायनाची गुरू - हरिहरन

माझ्या गायनाची खरी गुरू माझी आई आहे. माझे वडील हे आईचे गुरू होते. वडील संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यामुळे आमच्या घरात पहिल्यापासूनच गायनाची परंपरा होती. या परंपरेमुळेच माझ्या आईने आतापर्यंत बाराशेंहून अधिक विद्यार्थी हे गायक म्हणून घडविले आहेत. यामध्ये आता अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध झालेल्या गायकांचाही समावेश असल्याचे मत प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. गायकांनी मोबाईलचा जास्त वापर करू नये. मोबाईल हा गायकांचा गळा खराब करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो, असे सांगत, मोबाईलवर बोलण्याचे गायकांच्या आवाजावर कशा परिणाम होतो, याची उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :puneActorsinger