Pune Wall Collapse : कोंढव्याचं जाऊ दे; आज वर्ल्ड कपमध्ये कुणाची मॅच आहे रे?

Pune Wall Collapse. jpeg
Pune Wall Collapse. jpeg

तुम्ही स्वत: पुणेकर असाल किंवा अलीकडच्या काळात पुण्याला जाऊन आला असाल, तर एक चित्र बहुतांश रस्त्यांवर दिसलं असेल.. मेट्रोच्या उभारणीचं काम जिथं जिथं सुरू आहे, तिथं तिथं सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वाहतुकीची वाट लागलेली असते.. 'वाहतूक नियंत्रक' म्हणून ज्या कुणाला तिथे नेमलेलं असतं, त्यांचं कुणीही ऐकत नसतं. स्वयंभू पुणेकरांना इतरांच्या नियंत्रणाखाली राहण्याची मुळातच सवय नसल्यानं वाहतुकीच्या बाबतीत कुणाचंच कुणी ऐकत नसतं. त्यामुळे सगळा सावळा गोंधळ झालेला असतो.. मग अगदी काही वर्षांपूर्वी ज्या प्रवासाला 15 मिनिटं लागायची, त्याला आता अर्धा-पाऊण तास लागतोय.. पाहिलंय, अनुभवलंय हे? 

पुण्याची मुंबई होत चालल्याचं हे पहिलं लक्षण आहे.. दुसरं लक्षण म्हणजे जगण्याची सतत वाटत असलेली भीती! इथे कधी भिंत कोसळते; कधी जाहिरातीचा फ्लेक्‍स कोसळतो.. कधी झोपडपट्टीला आग लागते, तर कधी कालवाच फुटून सगळं वाहून जातं.. मुंबईत सामान्य माणसाच्या जीवाला काही किंमत राहिली नाही, हे सिद्ध होऊन बरीच वर्षं झाली. आता पुण्यामध्ये ती परिस्थिती आली आहे. 

'अ वेनस्डे'मधील नसिरुद्दीन शाहचा संवाद आठवतोय? 'काहीही झालं तरीही मरणार सामान्य माणूसच!' हेच सगळं पुण्यात सुरू झालंय. इथे कधी कुणाला काय होईल, काहीच सांगता येत नाही. आज फक्त ती भिंत कोसळली म्हणून असलं नकारात्मक विचार येत नाहीत. आपण या घटनांबाबत मुर्दाड होत चाललो आहोत, याचंच हे प्रतीक आहे. माध्यमांमध्ये काम करणारे आम्ही अशा घटनांच्या बाबतीत मुर्दाड झालेलोच असतो; पण सर्वसामान्य लोकही कसे सरावले आहेत, याची उदाहरणंही आता ठळकपणे दिसू लागली आहेत. मगाशी कर्वे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमध्ये शेजारच्या बाईकवर दोघं होते. त्यातला एक जण या कोंढव्याच्या घटनेविषयी बोलत होता.. त्याच्या बोलण्यावर दुसऱ्याचा रिप्लाय म्हणजे 'जाऊ दे.. आज वर्ल्ड कपमध्ये कुणाची मॅच आहे रे?'! हे प्रातिनिधिक आहे. प्रत्येक जणच असं बोलत असेल, असं नाही आणि प्रत्येकालाच दुर्घटनेविषयी हळहळ वाटेल असंही नाही. 

मुंबईच्या बाबतीत एक म्हटलं जातं, की इतर कुठेही मृत्युची टांगती तलवार घेऊन इतके नागरिक फिरत असतात. तिथे एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीमध्ये मुंबईकर मरतो, कधी पावसात बुडून जातो आणि कधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील पादचारी पूल कोसळून कुटुंब उध्वस्त होतं. आज पुण्यात काय सुरू आहे? जाहिरातीचा फलक कोसळून, कालवा फुटून आणि आता भिंत कोसळून पुण्यातही कुटुंब उध्वस्त व्हायला लागली आहेत. याचं आपल्याला काहीही वाटेनासं झालंय, हे जास्त दुर्दैवी आहे. 

भिंत कोसळून जीव गमावलेले इथले नव्हते.. म्हणून ते 'पुणेकर' नाहीत आणि म्हणून ते आपल्या जवळचेही नाहीत आणि म्हणूनच त्याचं आपल्याला काही घेणं-देणंही नाही. बांधकामावर असलेल्यांना उपकार म्हणून बांधून दिलेली घरं म्हणजे नेमकं काय असतं? चार पत्रे.. त्या चार पत्र्यांमध्ये किडुकमिडूक जमवलेलं आणि त्यातूनच उभं केलेला छोटासा, तोडकामोडका संसार.. हे सगळं उभं करायला त्यांची उमेद खर्च झाली आणि ते उध्वस्त व्हायला किती वेळ लागतो? सगळं संपतं त्या एका दुर्घटनेमध्ये.. प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहील.. राजकीय नेते येतील आणि भरभरून आश्‍वासनं देतील.. कुठल्यातरी स्वयंसेवी संस्था असतील मदतीला पुढचे काही दिवस.. मग काय? मीडियामध्ये चार दिवस हा विषय गाजत राहील.. पुढच्या आठवड्यात, याच दिवशी याच वेळी ते संसार उध्वस्त झालेले दुसरीकडे कुठेतरी आसरा शोधत, नोकरी सोडत फिरत असतील.. आपण मात्र तसंच स्थितप्रज्ञासारखं वागत राहू.. पुण्याची मुंबई झाल्याचा आणखी काय पुरावा हवाय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com