
Weather Update : पावसासाठी पोषक हवामान; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुणे : पुणेकरांना आता पुन्हा उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका मिळण्याची शक्यता आहे. शहर व परिसरात पुढील दोन दिवसानंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात तसेच शहरात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.
पुण्यात या आठवड्याच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावत उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांची सुटका केली होती. जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे आणि पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली होती.
त्यानंतर मात्र पावसाचे वातावरण निवळल्या नंतर पारा पुन्हा चढू लागल्याचे चित्र मागील दोन ते तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (ता. ११) शहरात १५.८ अंश सेल्सिअस किमान आणि ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या मंगळवारपासून (ता. १४) शहर व परिसरात ढगाळ वातावरणाची तसेच दुपारनंतर विजांसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण होत असून शनिवारी (ता. ११) कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शुक्रवारी देखील कोकणात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे ३७.५ अंश सेल्सिअस झाली. तर नीचांकी तापमान छत्रपती संभाजीनगर येथे १३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शनिवारी (ता. ११) उष्णतेच्या लाटेचा इशारा ः पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी.