esakal | 'आयफोन'पायी गमावले तब्बल 4 कोटी; पुण्यातील महिलेला फेसबुकवर गंडा

बोलून बातमी शोधा

'आयफोन'पायी गमावले तब्बल 4 कोटी; पुण्यातील महिलेला फेसबुकवर गंडा
'आयफोन'पायी गमावले तब्बल 4 कोटी; पुण्यातील महिलेला फेसबुकवर गंडा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : कोणीतरी अनोळखी व्यक्ती एका कंपनीतील उच्चपदावर काम करणाऱ्या महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. ती महिलाही कुठलाही विचार न करता, ती फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारते. केवळ तेवढ्यावरच न थांबता एकमेकांशी ओळख वाढवून व्हॉटस्‌अपद्वारे चॅटींगही सुरू होते. महिलेचा वाढदिवस येतो, ती व्यक्ती महिलेला आयफोन मोबाईल गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. पुढे नेहमीची कारणे सांगून ते गिफ्ट घेण्याचा बहाणा करून महिलेकडून पैसे उकळण्यास सुरूवात होते. महिला एक-दोन लाख नव्हे, तब्बल चार कोटी रुपये मोजते, त्यानंतर आपली आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो!

शहरातील एका नामांकीत कंपनीमध्ये 60 वर्षीय महिला उच्च पदावर काम करीत आहेत. त्यांची कौटुंबिक परिस्थतीही तितकीच चांगली आहे. पाच ते सहा महिन्यांपुर्वी महिलेच्या फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. संबंधीत महिलेने ती व्यक्ती आपल्या कोणाच्या संपर्कातील आहे का? ओळखीची आहे का? याचा विचार न करता, ती फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारते. संबंधीत व्यक्ती आपण ब्रिटनमध्ये राहण्यास असल्याचे सांगून महिलेची ओळख वाढवितो. त्यातून संबंधीत व्यक्ती महिलेचा विश्‍वास संपादन करतो. काही दिवसातच फेसबुकवर ओळख झालेली व्यक्ती महिलेचा व्हॉटस्‌अप क्रमांक घेतो. त्यानंतर त्याने महिलेशी चॅटींग करण्यास सुरूवात केली. चांगली ओळख झाल्याने महिलाही त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यास सुरूवात करते. दरम्यान, काही दिवसानंतर महिलेचा वाढदिवस असल्यामुळे त्या व्यक्तीने महिलेला महागडा आयफोन मोबाईल गिफ्ट म्हणून पाठविल्याची बतावणी केली.

हेही वाचा: पुण्यात नियम धाब्यावर बसवून सुरू होते ब्युटी सलून; डेक्कन पोलिसांची कारवाई

चार कोटी रुपयांची रक्कम 37 बॅंक खात्यात

महिलेला पाठविलेला आयफोन मोबाईल हा दिल्ली येथील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयात आले आहे. तेथून ते पार्सल घेण्यासाठी महिलेने एक, दोन नव्हे तर तब्बल 37 बॅंक खात्यांमध्ये तीन कोटी 98 लाख 75 हजार 500 रुपये इतकी रक्कम वेळेवेळी पाठविली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने बुधवारी थेट सायबर पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यावरुन सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

"महिलेच्या फसवणुकीचा प्रकार हा 'नायजेरीयन फ्रॉड'मधील आहे. त्यामध्ये चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आमच्या तपासातून सिद्ध झाले आहे. दोन दिवसापुर्वी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे.''अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

  • - अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्या

  • - अनोळखी व्यक्तींना, फोनला प्रतिसाद देऊ नका

  • - बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती इतरांना देऊ नका

  • - अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन व्यवहार करू नका

  • - ऑनलाईन व्यवहार करताना कुटुंबीयांना कल्पना द्या

  • - अनोळखी ईमेल, फ्रेंड रिक्वेस्ट, लिंकला प्रतिसाद देण्याचे टाळा

  • - अनावश्‍यक मोबाईल ऍप डाऊनलोड करू नका