मोबाईलने माझ्या राजाचा बळी घेतला हो...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

महाविद्यालयीन तरुणाने रात्री मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.

कोरेगाव भीमा (पुणे)  : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय 19) या महाविद्यालयीन तरुणाने रात्री मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. नेमक्‍या कोणत्या गेमच्या आहारी गेल्यामुळे ही घटना घडली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, संतोषचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. 

याबाबत लोणीकंद पोलिस तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले माळी कुटुंब नोकरीनिमित्त पेरणेफाटा (ता. हवेली) येथे स्थायिक आहे. वडील खासगी कंपनीत नोकरीस आहेत. तर आई गृहिणी आहे. अत्यंत शांत स्वभावाचा दिवाकर वाघोली येथील महाविद्यालयात कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, अलीकडे तो रात्र रात्रभर मोबाईलवर गेम खेळत असे. गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेलेला नव्हता. दरम्यान त्याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी लक्षात आली. मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान दुपारनंतर शोकाकूल वातावरणात पेरणेफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे व्यथित ग्रामस्थ अंत्यविधीप्रसंगी हळहळ व्यक्त करीत होते. शहरी भागात तरुण पिढी सध्या आहारी जात असलेल्या ब्लू व्हेल व पबजी सारख्या धोकादायक मोबाईल गेमच्या विळख्यात आता ग्रामीण भागातील तरुणाईही सापडू लागली आहे. 

मोबाईलमध्ये अनाकलयीन कोडवर्डस 
घरात सापडलेल्या चिठ्ठीत "आवर सन विल शाईन अगेन', "पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर फ्री झाला, आता कसल्याच बंधनात राहिला नाही,' "द एंड' असा मजकूर तसेच कसलासा कोड लिहिलेला आढळला. या घटनेत पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे. नेमक्‍या कोणत्या गेममुळे ही घटना घडली? याबाबत पोलिस नाईक एम. एल. अवघडे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या व्हॉट्‌सअप व फेसबुक डिपीलाही मोबाईल गेममधील 'ब्लॅक पॅंथर' या कॅरॅक्‍टरचा फोटो होता. 

मोबाईलने माझ्या राजाचा बळी घेतला : आजीचा आक्रोश 
घरामध्ये दिवाकरच्या खोलीत त्याच्यासमवेत आजी असे. रात्रभर तो मोबाईल गेम खेळत असे. तो गेमच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्याने आजी त्याला त्याबाबत नेहमी बोलत असे. मात्र तो दुर्लक्ष करीत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, काल आजी गावी गेल्याने तो घरात एकटाच होता. सकाळी ही घटना घडल्याचे आई वडिलांच्या लक्षात आले. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता. हाताशी आलेला एकुलता एक मुलगा केवळ मोबाईलमुळे गेल्याने अंत्यविधीप्रसंगी आई व आजीचा आक्रोश हृदय हेलावून टाकत होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune youth sucide due to mobile games