

Zika Virus Pune Risk Continues NIV Study Detects Virus in Mosquito Groups and Finds Genetic Changes in Asian Lineage
esakal
पुणे : पुण्यात २०२४ मध्ये झालेल्या ‘झिका’ विषाणूच्या उद्रेकानंतर करण्यात आलेल्या डासांच्या सर्वेक्षणात २६.५ टक्के डासांमध्ये ‘झिका’ विषाणूंचे प्रमाण आढळले आहे. महापालिकेच्या विविध भागांतील १२८ डासांच्या समूहांची तपासणी केली असता त्यापैकी ३४ समूहांमध्ये (२६.५ टक्के) ‘झिका’ विषाणूचे ‘आरएनए’ रेणू आढळले. डासांची वाढलेल्या प्रादुर्भावामुळे भविष्यातही या विषाणूचा पुन्हा प्रादूर्भाव पुण्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. हे संशोधन पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)च्या शास्त्रज्ञांनी केले असून त्याबाबतचा शोधनिबंध ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ मध्ये प्रकाशित झाला आहे.