तीन वर्षांनंतर झेडपीत बदल्यांचा मोसम होणार सुरू; प्रक्रियेतून 'यांना' वगळले!

Pune_ZP_transfers
Pune_ZP_transfers

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार येत्या सोमवारपासून (ता.१३) जिल्हा परिषदेत बदल्यांचा मोसम सुरू होणार आहे. तुर्तास या बदल्यांमधून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण किती कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, याबाबत जिल्हा परिषद प्रशासन संभ्रमात पडले आहे. त्यामुळे याबाबत पुणे जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. मात्र याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयही ठोस मार्गदर्शन करू शकले नाही. 

त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले आहे. ग्रामविकास विभागाकडून याबाबत मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच बदल्यांची अंतिम टक्केवारी कळू शकणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. 

प्रचलित पद्धतीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या दरवर्षी ३१ मे पूर्वी कराव्यात, असा नियम आहे. मात्र यंदा राज्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे यंदा बदल्या रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र हा निर्णय मागे घेत, येत्या ३१ जुलैपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

आतापर्यंतच्या नियमानुसार १० टक्के प्रशासकीय आणि १० टक्के विनंती बदल्या करण्यात येत असत‌. त्याबाबतचा अध्यादेश आहे. मात्र यंदाच्या बदली प्रक्रियेत एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के बदल्या करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यापैकी प्रशासकीय किती आणि विनंती बदल्या किती, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. 

तीन वर्षाच्या खंडानंतर बदल्या 

जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी  ३१ मे पूर्वी बदल्या करण्याची तरतूद आहे. परंतु मागील तीन वर्षे ही बदली प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे यंदा तीन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच या बदल्या होत आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वास्तव सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्याचा आदेश दिला आहे. यासाठी ३१ मे २०२० अखेरपर्यंतची सेवा यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रशासकीय आणि विनंती बदल्यांच्या संख्येबाबत मार्गदर्शन मागितले आहे.

- महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन),
जिल्हा परिषद, पुणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा आणि तालुकास्तर बदल्यांचे असे आहे वेळापत्रक

- संवर्गनिहाय वास्तव सेवाज्येष्ठता यादी सादर करणे - १३ जुलै.

- जिल्हास्तरावर एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करणे - १४ जुलै.

- सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे - १४ जुलै.

- सूचना व हरकती मागविणे - १५ जुलै.

- आक्षेप व सुचनांचे निराकरण करणे - १७ जुलै.

- अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे - १७ जुलै.

- समुपदेशनाने जिल्हास्तरीय बदली प्रक्रिया पूर्ण करणे - २० ते २५ जुलै.

- तालुकास्तरीय बदली प्रक्रिया पूर्ण करणे - २७ ते ३१ जुलै.

राज्यातील सर्वच कर्मचारी सध्या कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेबरोबर काम करत आहेत. शिवाय लॉकडाउनमुळे राज्याची परिस्थिती चिंतनीय आहे. यामुळे सध्या बदल्या करू नयेत. अन्यथा या बदल्यांमुळे 
कोरोनाच्या कामात विस्कळीतपणा येईल. राज्यावर आर्थिक बोजा पडेल.

- उमाकांत सूर्यवंशी, राज्य सरचिटणीस, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com