#PuneCrime माथाडीच्या नावाखाली खंडणी 

#PuneCrime माथाडीच्या नावाखाली खंडणी 

पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा पद्धतीने शहरामध्ये माथाडी संघटनांचे नाव पुढे करून व्यावसायिक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांकडून सर्रासपणे खंडणी वसुलीचा धंदा सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत या प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. 

शहरासह उपनगरांमध्ये मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पापासून मॉल, दुकाने, शोरुम्स, गोडावूनची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी मालाची ने-आण करण्यासाठी, मालाची चढ-उतार करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक किंवा बांधकाम व्यावसायिकांकडून कंत्राटे दिली जातात. संबंधित ठिकाणी राज्यासह परराज्यातील कामगार मोठ्या संख्येने काम करीत असतात. असे असतानाही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून काहीही न करता पैसे कमविण्यासाठी माथाडी संघटनांच्या नावांचा वापर करून किंवा एखाद्या किरकोळ संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष, पदाधिकारी असल्याचे सांगून संबंधितांकडे सरळसरळ खंडणी मागितली जाते. संबंधित संघटनांची माथाडी बोर्डाकडे  कुठल्याही प्रकारची नोंदणी नसल्याचीही सद्यःस्थिती आहे.

सातत्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची किंवा मालाची, वस्तूंची तोडफोड, नासधूस करण्याच्या किंवा चोरीची भीती व्यावसायिकांना असते. त्यामुळे ते पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. आतापर्यंत विमानतळ, चंदननगर, खडकी, चतुःशृंगी  यांसारख्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. 

माथाडीच्या नावाखाली खंडणी  
माथाडी संघटनांच्या नावाने उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या, त्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केले आहेत. त्यावरून काहींना अटकही झाली. परंतु, हा प्रश्‍न वाढत चालला आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि नोंदणीकृत माथाडी संघटना बदनाम होत आहेत.
- हनुमंत बहिरट, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मापाडी महामंडळ

नोंदणीकृत माथाडी संघटना व त्यांच्या कामगारांकडून उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना चांगले सहकार्य केले जाते. मात्र, माथाडीच्या नावाने काही बेरोजगार तरुण व गुन्हेगारांकडून त्यांचे कामगार ठेवण्यासाठी किंवा पैशांसाठी त्रास दिला जात आहे.
- प्रवीण चोरबेले,  व्यापारी प्रतिनिधी, माथाडी महामंडळ 

येथील व्यापाऱ्यांना केले जाते टार्गेट
बालेवाडी, बाणेर, औंध, येरवडा, खराडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा आदी वेगवेगळ्या भागांतील कंपन्या, गोडाऊन, मोठी दुकाने, बाजारपेठ, मॉल, शोरुम्स व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी खंडणीखोरांचा सुळसुळाट झाला आहे. मालाची चढ-उतार करण्यासाठी आपल्याच मर्जीतील व्यक्ती ठेवण्यापासून ते काहीही काम न करता भरमसाट पैशांची मागणी केली जाते. 

माथाडीच्या नावाखाली उद्योजक, व्यापारी किंवा व्यावसायिकांकडून कोणी खंडणी वसूल करीत असेल, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क करावा. अशा खंडणीखोरांची गय केली जाणार नाही.
- शिरीष सरदेशपांडे,  पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com