#PuneFlood सातशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

पुणे - खडकवासला धरणातून सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे वेगाने स्थलांतर करण्यात येत असून, शहराच्या विविध भागांतील ७०५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता हा आकडा रात्री वाढण्याची शक्‍यता आहे. सिंहगड रस्त्यासह येरवडा, शिवाजीनगर, बोपोडी, एरंडवणा परिसरातील नागरिकांची महापालिकेच्या विविध शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली.

खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने बहुतांश लोकांना वेळेत हलविल्याने नुकसान टळले. मात्र, ज्या भागांत यंत्रणा न पोचल्याने तेथे घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

पावसाचा जोर कायम राहिल्याने तीन दिवसांपासून धरणांतून विसर्ग वाढविण्यात येत आहे. शनिवारी रात्री ३५ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही विसर्ग वाढण्याची चिन्हे असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन महापालिकेने केले. त्यानंतर रविवारी सकाळपासून ४१ हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्याआधीच काही धोका पोचू शकणाऱ्या वसाहतीतील घरे महापालिकेने रिकामी केली. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५० शाळांत सुमारे दीड हजार जणांच्या निवासाची व्यवस्था केली आहे, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.

नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर येरवड्यातील शांतीनगर भागांतील तीनशे जणांना हलविल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मात्र, येथील अडीचशे घरांत पाणी शिरल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले. घरात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने लोकांना वस्तूही बाहेर काढता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक जणांचे नुकसान झाले. 

धरणातून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे, त्यानुसार टप्प्याटप्याने त्या त्या भागांतील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह ‘एनडीआरएफ’ची पथके आहेत. परिस्थितीनुसार लोकांची व्यवस्था केली जात असून, पाण्याची पातळी वाढल्यास आणखी काही लोकांना हलविण्यात येईल. 
- गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PuneFlood : Seven hundred citizens were shifted