#PuneIssue महिन्यानंतर अजूनही संसार उघड्यावरच!

 #PuneIssue महिन्यानंतर अजूनही संसार उघड्यावरच!

पुणे - मुठा उजवा कालवा फुटून बेघर झालेल्या दीडशे कुटुंबांना सावरण्यासाठी शहरातील आमदारांपासून मुख्यमंत्र्यांची यंत्रणा धावून आली. या लोकांसाठी मदतीचे आकडे जाहीर झाले आणि ही कुटुंबे पुन्हा आपला संसार उभारतील, अशी आशा वाढली; पण सरकारी यंत्रणेप्रमाणे राजकीय मंडळींची मदतही कुठे मुरली, याचा पत्ता कोणालाही लागलेला नाही.  परिणामी, कालवा फुटीच्या घटनेला महिना झाला तरी अजूनही अनेक कुटुंबे रस्त्यावरच राहत आहेत. घटनेनंतर तत्परतेचा आव आणलेली एकही यंत्रणा या लोकांकडे फिरकत नाही. या घटनेत नुकसान झालेल्या केवळ पाचच कुटुंबाना घरे मिळाली आहेत.

कालव्याला भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत दांडेकर पूल परिसरातील जवळपास दोनशे घरांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातील दीडशे कुटुंबे रस्त्यावर आली. घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे संसार वाहून गेले. आधीच हातावर पोट असलेल्या या लोकांपुढे जगण्याचा प्रश्‍न उभा ठाकला. घटनेनंतर महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी लोकांची शाळांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली. तेव्हा नेहमीप्रमाणे मदतीसाठी राजकीय मंडळींनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीचे हात पुढे केले.

रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन कोटी रुपये जाहीर केले. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर केली. या दुर्घटनेतील बेघरांना सावरण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र मोजक्‍याच लोकांपर्यंत मदत पोचली असून, ४६ कुटुंबे अजूनही जागा मिळेल, तिथे राहत आहेत. त्यांच्याकडे ना राज्य सरकार ना महापालिका लक्ष देत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकांच्या बाजूने गळा काढणारे पदाधिकारीही शांत झाले आहेत. या कुटुंबांना महिनाभरानंतरही मदतीची प्रतीक्षा असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. 

स्थानिक नगरसेविका प्रिया गदादे म्हणाल्या, ‘‘घटनेचा पंचनामा झाल्याने लोकांना मदतीची अपेक्षा होती. जिल्हा प्रशासनाने आपली कार्यवाही पूर्ण करून २० दिवस झाले, तरी नेमक्‍या गरजूंना मदती मिळालेली नाही. त्यांनी कुठे आणि कसे राहायचे, असा प्रश्‍न आहे.’’

अचानक आलेल्या पाण्याने सगळं घर त्या पाण्यात वाहून गेलं. महिन्यानंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. कालव्याच्या पाण्यात घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. घराच्या भिंती पडल्या आहेत. एक महिना उलटून गेला असला, तरी पोटाची घळगी भरण्यासाठी उघड्यावर चूल पेटवावी लागत आहे. महिन्यापासून उघड्यावरच संसार आहे.
-फरिदा पटेल, रहिवासी
 

कालवा फुटीच्या दुर्घटनेत लोकांना आवश्‍यक ती मदत केली आहे. घरांच्या उभारणीसाठीही सहकार्य करण्यात आले असून, त्यांच्या अडचणी जाणून नव्याने काही मदत करता येईल का, याबाबत प्रशासनाला सूचना केल्या जातील.
-मुक्ता टिळक, महापौर

अचानक आलेल्या पाण्याने पात्र- अपात्र घरे न पाहता, सरसकट घराचे नुकसान केले. मात्र प्रशासन मदत करताना पात्र- अपात्रतेचा निकष लावत मदत नाकारत असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आहेत.
-मनीषा गजघाटे, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com