पुणेकरांचा कौल ठरणार निर्णायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

संपूर्ण शहर चकाचक ठेवतानाच अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, स्वच्छ भारत अभियानात आता फोनद्वारे अभिप्राय घेऊनच अभियान स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. 

या प्रश्‍नांची नागरिकांनी सकारात्मक उत्तरे दिली, तरच महापालिकेला अव्वल स्थान मिळणार आहे. परिणामी, संपूर्ण शहर चकाचक ठेवतानाच अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या या अभियानात गेल्या वर्षी पीछेहाट झाल्यानंतर आता पुन्हा नव्या दमाने स्पर्धेत उतरण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यासाठी खास ‘लीग २०२०’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छेतला प्राधान्य देण्यात येणार आहे. अभियानात ४ हजार गुणानुसार तीन टप्पे आहेत.  अभियानाच्या अंमलबजावणीत सामान्य नागरिक केंद्रस्थानी राहणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभियानाची माहिती दिली. सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते.  

अभियानांतर्गत पथकामार्फत पाहणी करून मानांकन ठरविण्यात येते होते. परंतु, प्रत्येक टप्प्यासाठी ४८ नागरिकांना ११ प्रश्‍न विचारण्यात येतील. त्याची सकारात्मक उत्तरे अपेक्षित असून, ती नकारात्मक आल्यास गुण कमी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत महापालिकेला मानांकन वाढविताना खऱ्याअर्थाने अभियानाची अंमलबजावणी करावी लागेल. राव म्हणाले, ‘‘केवळ अभियान म्हणून नव्हे, तर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहभाग राहणार आहे. हे अभियान चार वर्षे राबविले जाईल. त्यात चार-चार महिन्यांचे तीन टप्पे असतील. महापालिकेसह नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शहरातील सर्वच घटकांना सामावून घेतले जाणार आहे.’’

कुठे कमी पडल्याचा अभ्यास
अभियानांतर्गत गेल्या वर्षी प्रचंड तयारी करूनही महापालिकेला ३७ वा क्रमांक मिळाला होता. यादीत आपले स्थान घसरल्याची बाब महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी नेमके कुठे कमी पडलो आहोत, याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्याकडून माहिती मागविली असून, त्यात आता सुधारणा करण्यात येतील, असे राव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar decision will be a decisive factor