पुणेकरांनी अनुभवला हिमबिबट्याचा थरार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे : हिमाच्छादित बर्फाळ प्रदेशातील उणे 28 डिग्री सेल्सिअस तापमानात कर्मा नावाच्या हिमबिबट्याचे मादीसोबतचे सहजीवन, शिकार आणि मृत्यूपर्यंतचा पट वन्य छायाचित्रकार राजेश बेदी यांनी कॅमेऱ्यातून अचूक टिपला आहे. "द स्टोरी ऑफ स्नो लेपर्ड' या माहितीपटाच्या काही मिनिटांच्या एका झलकेतून पुणेकरांनी हिमबिबट्याचा थरार अनुभवला. 

पुणे : हिमाच्छादित बर्फाळ प्रदेशातील उणे 28 डिग्री सेल्सिअस तापमानात कर्मा नावाच्या हिमबिबट्याचे मादीसोबतचे सहजीवन, शिकार आणि मृत्यूपर्यंतचा पट वन्य छायाचित्रकार राजेश बेदी यांनी कॅमेऱ्यातून अचूक टिपला आहे. "द स्टोरी ऑफ स्नो लेपर्ड' या माहितीपटाच्या काही मिनिटांच्या एका झलकेतून पुणेकरांनी हिमबिबट्याचा थरार अनुभवला. 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऍम्फी थिएटर येथे नेचर वॉक, ऍडव्हेंचर फाउंडेशन आणि फर्ग्युसन महाविद्यालय आयोजित वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हलचे उद्‌घाटन बेदी यांच्या हस्ते झाले. हा फेस्टिव्हल 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, क्रेडाई पुणे मेट्रोचे संजय देशपांडे, महाराष्ट्र इकोटुरिझम विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लिमये, क्रीकवुड्‌सचे साहिल इस्माईल, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, प्रशांत कोठडिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी "बेदीज टस्कर टेल' हा हत्ती या विषयावरील फोटो-साउंड स्लाइड शो दाखविला. तसेच, भारतीय हिमबिबट्याच्या जीवनप्रवासावर तयार करीत असलेल्या "द स्टोरी ऑफ स्नोलेपर्ड' या माहितीपटाची झलक दाखविण्यात आली. 

या वेळी बेदी म्हणाले, "हिमालयामध्ये हिमबिबट्यांचे जीवन कॅमेऱ्यात टिपणे हा आव्हानात्मक, रोमांचक अनुभव होता. उणे 28 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या बर्फाळ प्रदेशातील डोंगररांगांमध्ये स्थानिक माहीतगाराला सोबत घेऊन याक, गाढवावर बसून प्रवास करून हिमबिबट्याला कॅमेऱ्यात टिपता आले. अनेक दिवसांची मेहनत, संयम आणि चिकाटीमुळे हा माहितीपट तयार करू शकलो. यामध्ये कर्मा नावाच्या हिमबिबट्याचा जीवनपट आहे. त्याचे मादी बिबट्यासोबतचे जीवन, जगण्यासाठी अन्य प्राण्यांची केलेली शिकार, त्याच्या अकस्मात मृत्यूपर्यंतचा प्रवास टिपला आहे. या माहितीपटाचे पहिले स्क्रीनिंग मी पुण्यातच करणार आहे.'' 
याप्रसंगी सौरभ राव यांच्यासह अन्य मान्यवरांची मनोगतपर भाषणे झाली. प्रास्ताविक अनुज खरे यांनी केले. मुक्ता वाघ यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Punekar experience wild Leopard