Loksabha 2019 :  मतदानासाठी पुणेकर सज्ज

Loksabha 2019 :  मतदानासाठी पुणेकर सज्ज

पुणे - पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान होणार आहे. सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासह अनेक घटकांकडून निवडणुकीची तयारी सुरू असून, मतदानप्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे. आता मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याची वेळ असून, जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडणे अपेक्षित आहे.

पुण्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय केंद्रांवर सोमवारी निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅटसह निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. त्यापूर्वी सकाळी सहा वाजता एक तासाच्या कालावधीत ‘मॉक पोल’ होईल. त्यात सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनवर मतदान करून मशिन तपासण्यात येतील. त्यानंतर सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरवात होईल.

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी व्हीलचेअर आणि १४ ते १६ वयोगटांमधील विद्यार्थी स्वयंसेवकांची भूमिका बजावतील. महिला अधिकारी व कर्मचारी असलेले ‘सखी’ मतदार केंद्रेही असतील. मतदार चिठ्ठ्यांचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे.

पुणे मतदारसंघातील ९१ आणि बारामतीतील ६२ संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघात सात दुर्गम ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना वायरलेस यंत्रणा देण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार जनजागृतीमुळे सहा महिन्यांत तीन लाख ९२ हजार ७२९ मतदार वाढले आहेत.  

काही ठिकाणी मतदान केंद्रात बदल
दिव्यांग मतदारांना अडचणी येऊ नयेत, तसेच अन्य काही कारणांमुळे चार मतदारसंघांत काही मतदान केंद्रांमधील २३७ सहायकारी मतदान केंद्रे बदलली आहेत. मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्याची माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येत आहे.

बोगस मतदान रोखणार 
शहरातून स्थलांतरित झालेल्या, मृत आणि बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्‍यता असते. परंतु, अशा मतदारांची यादी जिल्हा प्रशासनाकडे असून, त्यांच्या नावे मतदान करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. 

टपाली मतदानासाठी २२ हजार मतपत्रिका 
जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी २२ हजार मतपत्रिका पाठविल्या आहेत. सैन्यदल आणि राखीव पोलिस दलातील साडेचार हजार सर्व्हिस व्होटर्सना ‘ईटीपीबीएस’ पोर्टलद्वारे ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या आहेत. 

नादुरुस्त ईव्हीएम २० मिनिटांत बदलणार 
केंद्रांवर २० टक्‍के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन अतिरिक्‍त आहेत. मशिनमध्ये तांत्रिक अडचण आल्यास ती २० मिनिटांत बदलण्यात येतील. ग्रामीण भागात त्याला अर्धा तास लागेल. परंतु, तोपर्यंत नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

जाणून घ्या मतदानाची प्रक्रिया
1. मतदान केंद्रावर जाताना
मतदान ओळखपत्र, छायाचित्रयुक्‍त मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत ठेवा. केंद्रांवर महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा. दिव्यांग मतदारांना व्हील चेअरसह स्वयंसेवकांकडून सुविधा पुरविण्यात येतील.

2. आपली ओळख सांगा
तुम्ही मतदान कक्षातील पहिल्या अधिकाऱ्याकडे जा. तेथे मतदार यादी असेल. तुमचे नाव, यादीतील क्रमांकांची तपासणी करा.

3. तुमची ओळख पटल्यानंतर 
तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या मतदान अधिकाऱ्याकडे जा. तो अधिकारी तुमच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावेल. तुमचा मतदान क्रमांक रजिस्टरमध्ये नोंद करेल. त्यानंतर रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करावी लागेल.

4.लोकसभा निवडणुकीसाठी मतपत्रिका युनिट
आता तुम्ही तिसऱ्या क्रमांकाच्या मतदान अधिकाऱ्याकडे जाल. हा अधिकारी गुप्त मतदानासाठी ईव्हीएमच्या बाजूचे कंट्रोल युनिट कार्यान्वित करेल. तुम्ही आपल्या उमेदवाराच्या नावापुढील निळे बटन दाबा. छोटे बटन लाल चमकेल किंवा बीपचा आवाज होईल. जे की आपले मतदान सफल झाल्याची खात्री करेल. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या उमेदवारास मत नोंदविल्याबाबत खात्री करून घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com