पुणेकर चालवतोय "श्रीपाद रेडिओ स्टेशन'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

  • संगीत, आरोग्य टिप्स, पाककलांसोबतच रंजक माहिती चोवीस तास सुरू

पुणे : पुण्यातील एक अवलिया चक्क एक रेडिओ स्टेशन चालवत असून, "श्रीपाद रेडिओ' असे त्यांच्या स्टेशनचे नाव आहे. हे स्टेशन चोवीस तास सुरू असते. त्यावर तुम्हाला विविध प्रकारचे संगीत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विविध रंजक माहिती देण्याबरोबरच ज्ञानात भर घालणारे शब्द ऐकायला मिळतात. मुलांसाठी "शुभंकरोति' आणि ज्येष्ठांसाठी आरोग्याच्या टिप्स, महिलांसाठी पाककला अतिशय रंजक पद्धतीने सादर केल्या जातात. विशेष म्हणजे, ते रेडिओचे संग्राहक आहेत. अगदी सुरवातीच्या "व्हाल्व्ह'पासून ते "डिजिटल'पर्यंतचे विविध रेडिओ त्यांच्या संग्रहात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक रेडिओ दिनानिमित्त याबाबत "सकाळ'ला त्यांनी माहिती दिली. कात्रजमध्ये राहणारे श्रीपाद कुलकर्णी महावितरणचे निवृत्त कार्यकारी अभियंता आहेत. कुलकर्णी यांना लहानपणापासून रेडिओ ऐकण्याची आवड होती. निवृत्तीनंतर आजही ते दिवसभरात आठ ते दहा तासांपेक्षा अधिक वेळ रेडिओ ऐकतात. त्यांच्या संग्रहात नॅशनल एको, जीईसी हे 1957 मधील जुन्या कंपनीचे इंग्लडमधील बनावटीचे रेडिओ आहेत. "व्हाल्व्ह' सर्वांत जुना रेडिओ आहे. तो सुरू होण्यास एक मिनिट वेळ लागतो. हे सर्व रेडिओ चालू स्थितीत आहेत. त्यांच्या संग्रहात दोनशे रुपयांपासून 17 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीचे रेडिओ आहेत. सर्वांत महागडा ऍमॅच्युअर रेडिओ त्यांनी कॅनडामध्ये विकत घेतला. त्यामध्ये सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी ऐकता येतात.

आप आमदाराच्या गाड्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

"श्रीपाद रेडिओ' या इंटरनेट रेडिओवर दिवसभर विविध कार्यक्रम ऐकता येतात. हिंदी, मराठी गाणी तसेच काही माहिती व मनोरंजनप्रधान गोष्टी प्रसारित होतात. व्हॉटसऍपवरील संदेश ते श्राव्य स्वरूपात प्रसारित करतात. महापुरुषांविषयी तसेच सेलिब्रेटींविषयी विशेष कार्यक्रम प्रसारित होतात. हे स्टेशन जगभरात कुठेही ऐकता येते. हजारो श्रोत्यांचा त्यांना प्रतिसाद मिळतो. अनेकांना यू ट्यूब चॅनेलची माहिती आहे; मात्र, रेडिओ स्टेशन सुरू करता येते, याबाबत फारशी माहिती नसते. त्यांचे हे चॅनल ऍपवरूनही ऐकता येते.
चॅनलची लिंक www.internet-radio.com/station/shripadradio अशी आहे. श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वत:च एक पॉकेट रेडिओही तयार केला आहे.

"हॅम'चे संघटन
वायरलेस ऑपरेटरचे तंत्र जाणणाऱ्या "हॅम'ची संघटना श्रीपाद कुलकर्णी चालवितात. पुण्यात या संघटनेचे 35 सदस्य आहेत. एखाद्या आपत्तीच्या ठिकाणी अनेकदा संपर्कयंत्रणा ढासळते. अशावेळी हॅमचे सदस्य काही मिनिटांतच एक रेडिओ फ्रिक्वेन्सी स्टेशन सुरू करतात आणि एकमेकांशी संपर्क साधत असतानाच आपद्‌ग्रस्तांना मदत करतात. सांगली, कोल्हापूर येथे महापुराच्या वेळी "हॅम'नी सरकारी यंत्रणेला मोठी मदत केली होती. या कामासाठी शासकीय परवाना आवश्‍यक असतो. पाच हजार किलोमीटरपर्यंत हॅम संपर्क साधू शकतात.

आज रेडिओ डे सेलिब्रेशन
पुण्यातील एरंडवणे येथील मेहेंदळे गॅरेजजवळील अभिषेक हॉटेलमागे इन्स्टिट्यूशन्स ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्समध्ये रेडिओ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये विलास रबडे, किशोर शेंडे, विश्‍वास काळे, श्रीपाद कुलकर्णी हे रेडिओच्या विविध पैलूंवर व्याख्यान देणार आहेत. हे प्रदर्शन उद्या (ता. 13) सकाळी साडेदहाला सुरू होणार असून, दुपारी साडेतीननंतर व्याख्यान होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekar runs Shripad Radio Station

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: