पीएमपीच्या समस्या घेऊन पुणेकर सरसावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करण्याचे आव्हान पीएमपीएमएलचे नूतन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यासमोर आहे. मुंढे कार्यक्षम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. पुणे शहराच्या सार्वजनिक व्यवस्थेत नेमक्या कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, असे आपल्याला वाटते? आम्हाला कळवा 
- प्रतिक्रियांच्या माध्यमातून
- सविस्तर प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर पाठवा. Subject मध्ये लिहा: PMPML
- सकाळ संवाद मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आपल्या सूचना पाठवा

 

पुणे - पीएमपीएमएलच्या बसेस आणि स्थानके यांच्यात सुधारणा व्हावी... त्यांची योग्य देखभाल केली जावी... नादुरुस्त बस वापरातून काढून टाकाव्यात... बसची संख्या वाढवावी... अशा विविध समस्या पुणेकरांनी कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यासमोर 'सकाळ'च्या माध्यमातून मांडल्या आहेत. 

तुकाराम मुंढे यांनी पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नेमक्या कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, यावर 'सकाळ' ने प्रतिक्रीया मागवल्या होत्या. पुण्यातील सार्वजनीक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी काय सुधारणा केल्या पाहिजेत, यासाठी पुणेकरांना उपाय सुचवले. त्यापैकी निवडक प्रतिक्रीया...

'शहरात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या काही बसेस मधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. अशा बसचा वापर पीएमपीने बंद करायला हवा. तसेच वारंवार बंद पडणाऱ्या जुन्या बसचा वापरही थांबवण्यात यावा. शहरातील कोथरुड, सिंहगड रोड, विमाननगर, मनपा, हिंजवडी या भागातून वातानुकुलीत बससेवा सुरु करण्यात यावी.'
- स्वप्नील देशपांडे

'वाघोली ते हडपसर प्रमाणे वाघोली ते पुणे स्टेशन या मार्गावरही नवीन बस सुरु करण्यात यावी. याचा फायदा या मार्गावर असलेल्या वाडिया कॉलेज, बी. जे. कॉलेज, मोझे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होईल. असे झाल्यास दुसऱ्या मार्गावरील बसचा ताण कमी होईल. पीएमपीएमएलच्या स्थानकांची दुरावस्था झालेली असून त्यांची डागडुजी करण्यात यावी. तसेच लांबच्या मार्गावरच्या बस ठरलेल्या स्थानकांवर थांबविण्यात याव्यात. बसमध्ये वृद्ध व महिला यांना प्राधान्य द्यावे, बसच्या योग्य वेळांबाबतही प्रवाशांना सुचीत करण्यात यावे.  
- एस. एन. कुलकर्णी

'बीआरटी सेवा बंद करण्यात यावी'
- संतोष अनारसे

बऱ्याच वेळा एका मार्गावरील बसेस एकामागेएक लगेच धावत असतात. त्यामुळे काही बसमध्ये गर्दी असते, तर मागील बस रिकाम्या राहतात. त्यानंतर पुढील बराच वेळ बस नसते. यावर काहीतरी योग्य उपाय करावा.
- वाचक

'वारंवार यांत्रिक बिघाड होणाऱ्या गाड्यांची व्यवस्थित दुरुस्ती करण्यात यावी. पीएमपीच्या बस बाहेरुन आणि आतुन स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. बसमध्ये स्वच्छता राखल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होउ शकते. बसमधील आसनव्यवस्था चांगली करण्यात यावी. सध्याच्या मार्गांवरील बसच्या मागणी आणि पुरवठा याबाबतचा आढावा घेऊन त्यानुसार योग्य बसची संख्या वाढवण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा. तसेच नवीन बस विकत घेण्याची रखडलेली प्रक्रिया वेगाने व्हावी. या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याला ठरावीक वेळ देउन ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणाव्यात तसेच जीपीएसच्या माध्यमातून प्रवाशांना बसचे नेमके ठिकाण माहिती करुन देणारी सुविधा सुरु करावी.
- आनंद जोशी

 

Web Title: Punekar talks about PMPML problems