#PuneRains : भिगवणमध्ये घरे, दुकाने, बॅंकेत पावसाचे पाणी; कोटयवधीचे नुकसान

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 15 October 2020

भिगवण शहरांमध्ये पावसामुळे सुमारे शंभरहुन अधिक घऱांमध्ये पाणी घुसले तर अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यावसायिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भिगवण : भिगवण शहरांमध्ये बुधवारी (ता. १४) दिवसभर झालेल्या विक्रमी २०४ मि.मि. पावसामुळे शहरातील सुमारे शंभरहुन अधिक घऱांमध्ये पाणी घुसले तर अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यावसायिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला असलेल्या महाराष्ट्र बॅंकेच्या बाजुची संरक्षण भिंत कोसळुन बॅंकेमध्ये व मुद्रा पेटी(करंन्सी चेस्ट)मध्ये पाणी घुसुन बॅंकेचेही मोठे नुकसान झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भिगवण शहरांमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक २०४ मि.मि. पावसांची नोंद येथील महाबॅंक ग्रामीण विकास केंद्रामध्ये झाली आहे. बुधवारी(ता.१४) सकाळी दहा पासुनच मुसळधार पावसास सुरुवात झाली होती. रात्री दहापर्यंत सातत्याने सुरु असलेल्या पावसांमुळे भिगवण शहर जलमय झाले होते. शहराच्या पश्चिम भागातील पाणी एस.टी. बस स्थानकांपासुन थोरात नगर येथे घुसल्यामुळे थोरात नगर येथील सुमारे पन्नासहुन अधिक रो हाऊस तसेच काही बंगल्यामध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तांराबळ उडाली. थोरात नगर येथील व्यावसायिक गाळ्यांमध्ये व पार्किंगमध्ये सुमारे सहा आठ फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांचे तसेच वाहनांचेही मोठे नुकसान झाले. मुख्य पेठेतीलही काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खबराहट निर्माण झाली होती. रात्री रस्त्यावरुन वहात असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील पुर्वा फुडस् या फरसान कारखान्यामध्ये पावसाचे पाणी शिरुन मालाचे मोठे नुकसान झाले.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रची सुमारे दहा फुट उंचीची संरक्षक भिंत पावसांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पडली. संरक्षक भिंत पडल्यामुळे पावसाचे पाणी थेट बॅंकेमध्ये घुसल्यामुळे बॅंकेच्या कार्यालयांत सुमारे एक ते दिड फुटापर्यंत पाणी साचले होते. बॅंक व  बाजुला असलेल्या मुद्रा पेटी(करंन्सी चेस्ट)मध्येही पाणी घुसल्यामुळे संगणक, कागदपत्रे पाण्यामध्ये भिजली. मदनवाडी(ता.इंदापुर) येथील ओढयालाही पुर आल्यामुळे पुराचे पाणी अनेकांच्या घरांमध्ये घुसल्यामुळे जीवनावश्यक वस्तुचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरे वाहुन गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ओढयाला आलेल्या पुरामुळे ओढयाच्या बाजुच्या जमिनी व पिकांचे नुकसान झाले आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

याबाबत बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक उमेश घोडके म्हणाले, बॅंक महाराष्ट्रच्या बाजुची संरक्षक भिंत कोसळुन बॅंकेचे मोठे नुकसान झाले आहे. बॅंकेमध्ये सुमारे फुट दिड फुट पाणी साचले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुच्या पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. याबाबत थोरात नगर येथील रहिवासी विजय थोरात म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजुकडील सर्व पाणी थोरात नगर येथे येत असल्यामुळे या भागात सातत्याने रहिवाशांना अडचणी येत आहेत. प्रशासनाने याबाबत योग्य उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #PuneRains : Billions lost due to rains in Bhigwan