पुण्यात दहा वर्षांतील नीचांकी तापमान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

दहा वर्षांमधील सर्वाधिक थंड रात्र 
पुण्यात गेल्या दहा वर्षांत 20 डिसेंबर 2010 रोजी सर्वांत थंड रात्र नोंदली गेली आहे. त्या रात्री किमान तापमान 6.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर 11 डिसेंबर 2016 रोजी 8.3, तर 2017 मध्ये 8.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. या दोन्ही वर्षांपेक्षा यंदा जास्त थंड रात्रीची नोंद झाली. 

पुणे : पुणेकर थंडीने आज (शनिवारी) अक्षरशः थंडीने गारठले, कारण गेल्या दहा व्रर्षांतील निचांकी तापमान आज नोंदविले गेले. पुण्यात किमान तापमान 5.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतची ही सर्वांत थंड रात्र ठरली. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर हुडहुडी जाणवत होती. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  शहरात शुक्रवारी दिवसभर गारठा जाणवत होता. कमाल तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 25.2 अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे पुणेकर दिवसाही स्वेटर, जर्कीन, कानटोपी घालून दैनंदिन व्यवहार करीत असल्याचे चित्र दिसत होते. 

मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा वाढला होता. हा प्रभाव बुधवारी रात्रीपासून कमी झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत होता. बुधवारी (ता. 26) किमान तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. तर, दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता. 27) चार अंश सेल्सिअसने कमी होऊन 10 अंश सेल्सिअस नोंदला गेला. गेल्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने घसरले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात किमान तापमानाचा पारा 7.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. आज तर पारा 5.9 अंश इतका नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

दहा वर्षांमधील सर्वाधिक थंड रात्र 
पुण्यात गेल्या दहा वर्षांत 20 डिसेंबर 2010 रोजी सर्वांत थंड रात्र नोंदली गेली आहे. त्या रात्री किमान तापमान 6.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर 11 डिसेंबर 2016 रोजी 8.3, तर 2017 मध्ये 8.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. या दोन्ही वर्षांपेक्षा यंदा जास्त थंड रात्रीची नोंद झाली. 

थंडी राहणार कायम 
शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. पुढील 24 तासांत किमान तापमान आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

राज्य गारठले... 
उत्तरेकडील राज्यांतून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे. राज्यात नागपूर येथे सर्वांत नीचांकी म्हणजे 5.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यातील थंडी कायम राहणार असून, विदर्भात लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांत गोठविणारी थंडी आली आहे. जानेवारीपासून पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढणार असल्याने उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातही हुडहुडी कायम राहण्याची शक्‍यता आहे. हे वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

Web Title: Punes recorded lowest temperature in last ten years