दहशतवादी हल्ल्यात पुण्याचा जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

फुरसुंगी (पुणे) : जम्मू- काश्‍मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर शनिवारी (ता. 17) केलेल्या हल्ल्यात गंगानगर (फुरसुंगी) येथील लान्सनायक सौरभ नंदकिशोर फराटे (वय 32) यांना वीरमरण आले. आठ दिवसांपूर्वीच सुटी संपवून जम्मू- काश्‍मीरला कर्तव्यावर हजर झालेल्या सौरभ यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आज रात्री सौरभ यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. सोमवारी (ता. 19) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सौरभ फराटे हे रायफल रेजिमेंटमध्ये होते. त्यांचा धाकटा भाऊ रोहित हाही जम्मू-काश्‍मीरमध्ये लष्करात आहे.

मूळचे लोणीकंद येथील सौरभ हे 2004 मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. सौरभ यांना सेवेतून निवृत्त होण्यास चार वर्षे शिल्लक होती. सौरभ यांच्या लग्नाचा वाढदिवस 28 ऑक्‍टोबरला व 24 नोव्हेंबरला त्यांच्या जुळ्या मुली आराध्या व आरोही यांचा वाढदिवस असल्याने सौरभ हे सुटीवर आले होते. कर्तव्यावर हजर होण्यासाठी नऊ डिसेंबरला ते जम्मू- काश्‍मीरला रवाना झाले होते. केवळ दहा दिवसांपूर्वीच घरून सर्वांना भेटून गेलेल्या सौरभ यांच्या मत्यूची बातमी शनिवारी घरी पोचताच त्यांची पत्नी सोनाली, आई मंगल, वडील नंदकिशोर यांना मोठा धक्का बसला. सौरभ हुतात्मा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरून सर्वत्र शोककळा पसरली.

सौरभ याला लष्करात भरती होऊन देशसेवाच करायची होती. भरतीच्यावेळी तो आम्हालाही बरोबर घेऊन जायचा. आम्हालाही लष्करात भरती होण्याचा आग्रह करायचा, असे भूषण देशपांडे, प्रमोद दळवी, रोहित रसाळ, गोरक्ष पवार या सौरभच्या मित्रांनी सांगितले.

पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

देशासाठी पोरगा हुतात्मा झाला याचा अभिमान आहेच; परंतु सध्या सीमेवर सतत अशा घटना घडत आहेत. सरकारने दहशतवाद्यांविरोधात कडक मोहीम राबवणे गरजेचे आहे.
- नंदकिशोर फराटे, सौरभ यांचे वडील

Web Title: pune's soldier farate martyred in terror attack