आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा कायम 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा कायम 

पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.  

याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय ४५, रा. खडक पोलिस वसाहत) आणि रामचंद्र तात्याबा घुले (५६, रा. ईसीपी वास्तू, अथर्व पूर्वा सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तो निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी कायम ठेवला आहे. देविदास सूर्यभान पुंजरवाड असे आत्महत्या केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्यांचा भाऊ पोलिस कॉन्स्टेबल शिवशंकर सूर्यभान पुंजरवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. अपिलामध्ये अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहताना दोघांची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली.  

देविदास यांची पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र प्रशिक्षण खडतर असल्यामुळे ते पळून गेले होते. त्यानंतर वडिलांनी देविदास यांना पुन्हा प्रशिक्षणाच्या ठिकाणी आणून सोडले होते. त्या वेळी संबंधित पोलिस निरीक्षकांनी त्याला रुजू करून घेतले होते. मात्र, त्यासाठी त्यांच्याकडे साळुंखे याने पाच हजार आणि घुले याने दहा हजार रुपये मागितले होते. पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांचा छळ सुरू केला. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून ४ सप्टेंबर २०१२ रोजी देविदास यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. साळुंखे आणि घुले यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे एसएमएस त्यांनी दहा मित्रांना पाठविले होते. शिवाय वर्दीवरही दोघांकडून त्रास दिला जात असल्याचे लिहून ठेवले होते. फिर्यादीचे वडील सूर्यभान पुंजरवाड यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली होती. या खटल्यात तब्बल १८ जणांची साक्ष झाल्यानंतर १९ डिसेंबर २०१४ रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com