

पंजाबच्या दोन घटनांचे
स्पष्टीकरण मागविणार
गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
नवी दिल्ली, ता. १६ (पीटीआय) : मानसिक ताणातून पंजाबमधील दिर्बा येथे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू आणि मानसा येथे अमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची हत्या, या दोन घटनांबाबत केंद्र सरकार पंजाब सरकारकडून स्पष्टीकरण मागविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये शहा यांनी पंजाबमध्ये अमली पदार्थांचा व्यापार, गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीचा धोका वाढत असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी राज्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. मानसा येथील गजबजलेल्या बाजारपेठेत मंगळवारी औषध विक्रेता अश्विनी कुमार याने झोटा यांच्यावर गोळीबार केला. त्यात झोटा यांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ नागरिकाला गुंगीची औषधे विकल्याबद्दल झोटा यांनी विक्रेत्याला जाब विचारला होता. या प्रकरणी विक्रेता अश्विनीकुमार याला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत, संगरूर जिल्ह्यातील दिर्बा येथील गुलजार सिंग यांनी सात सप्टेंबरला आत्महत्या केली होती. स्थानिक भागातील अमली पदार्थांच्या पुरवठ्याबाबत अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांना प्रश्न विचारल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला आणि जातिवाचक अपशब्द वापरण्यात आले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मान यांचा शहांना प्रत्युत्तर
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री मान यांनी गुजरातमधील कांडला बंदरावर तीन हजार किलो अमली पदार्थ जप्त झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. पंजाबवर आरोप करण्याऐवजी शहा यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. पुढीलवर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपने सत्तेवर आल्यास डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाब अमली पदार्थमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.