'पीएनबी'ने हजारो कोटी रुपये केले 'राइट ऑफ'; बड्या थकबाकीदारांची नावे ठेवली गुलदस्त्यात!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील मागितला होता. त्याला उत्तर देताना चार वर्षांअगोदरची निर्लेखित रक्कम आणि वसुलीची माहितीच उपलब्ध नसल्याचा दावा बँकेने केला आहे.

पुणे : पंजाब नॅशनल बँकेने चार वर्षात 100 कोटीपेक्षा जास्त कर्ज असलेल्या बड्या थकबाकीदारांचे 31 हजार 966 कोटी रुपये निर्लेखित (राइट ऑफ) केले आहेत. आजवर त्यातील केवळ 7 हजार 028 कोटी रुपये वसूल झाली आहे. बड्या थकबाकीदारांची नावेही बँकेने गुलदस्त्यात ठेवली आहेत. 

Maratha Reservation : ...तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल!​

बँकेनेच अधिकृतरित्या ही माहिती दिली‌ आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील मागितला होता. त्याला उत्तर देताना चार वर्षांअगोदरची निर्लेखित रक्कम आणि वसुलीची माहितीच उपलब्ध नसल्याचा दावा बँकेने केला आहे. गेल्या फक्त चारच वर्षांची माहिती उपलब्ध असल्याचे मला कळवले गेले, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.

बँकेने अर्धवट माहिती दिली आहे. 31 मार्च 2020 पर्यंत निर्लेखित कर्जातील फक्त 22 टक्के रक्कम बँक वसूल करू शकली. 2016 पूर्वीच्या निर्लेखित कर्जांची माहितीच बँकेकडे नाही. तसेच या बड्या कर्जदारांची नावेही गोपनीयतेच्या नावाखाली देण्यात आली नाहीत. ही माहिती गोपनीय असेल, तर स्टेट‌ बँकेने 225 बड्या कर्जदारांची नावे कशी दिली, हा प्रश्न निर्माण होतो, असे ते‌ म्हणाले.

दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू; पुणे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर!​

आणखी एक माहिती मागविण्यात आली होती. ज्यात गेल्या आठ वर्षांत बँकेने एकूण किती कर्जे निर्लेखित केली आणि आजतागायत त्यातील किती वसूल झाली. याच्या उत्तरातही बँकेने गेल्या चारच वर्षांची माहिती उपलब्ध असल्याचे सांगून या कालावधीत एकूण 44 हजार 564 कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित करण्यात आली असून, त्यापैकी 12 हजार 28 कोटी रुपयांची आजवर वसुली झाल्याचे सांगितले, पण बँकेच्या वेबसाईटचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले की, गेल्या दहा वर्षांचे वार्षिक अहवाल उपलब्ध आहेत. त्यानुसार गेल्या आठ वर्षांत बँकेने तब्बल 61 हजार 741 कोटी रुपये 'राइट ऑफ' केले आहेत, असा‌ दावा वेलणकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारने कर्ज वसुलीसाठी कडक कायदे करूनही वसुली होत नाही. बँका बड्या थकबाकीदारांची माहिती देणे टाळत आहेत. बँकांचा हा कारभार पारदर्शक म्हणायचा का, असा प्रश्न विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab National Bank has write off Rs 31966 crores