दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू; पुणे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

सरवदे आणि गायकवाड यांच्यासह शहर पोलिस दलातील आत्तापर्यंत आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे : शहर पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. त्यापैकी एक अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. एकाच दिवशी दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्याही आरोग्याचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे. 

Maratha Reservation : ...तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल!​

विलास सरवदे (वय 55) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते चतु:शृंगी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. सरवदे यांना मागील महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी कमांड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता.24) सकाळी त्यांचे निधन झाले. 

जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झाली लेक; आईनं सुरू केलं आमरण उपोषण!​

सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष जगन्नाथ गायकवाड (वय 58) हे शिवाजी नगर येथील पोलिस मुख्यालयामध्ये नेमणुकीस होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचा मृत्यू झाला. गायकवाड हे 31 ऑगस्टला शहर पोलिस दलातून निवृत्त झाले होते, त्यापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सरवदे आणि गायकवाड यांच्यासह शहर पोलिस दलातील आत्तापर्यंत आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two ASI of Pune City Police Force died due to corona infection