esakal | पुरंदर विमानतळासाठी बारामतीतील ३, पुरंदरची ५ गावे
sakal

बोलून बातमी शोधा

Airport

पुरंदर विमानतळासाठी बारामतीतील ३, पुरंदरची ५ गावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदर तालुक्‍यातील (Purandar Tahsil) नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या (International Airport) नव्या जागेचे (New Place) प्रारूप सर्वेक्षण (Survey) पूर्ण करण्यात आले आहे. नव्या सर्वेक्षणात पुरंदर तालुक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातील (Baramati Tahsil) तीन गावांचा समावेश असलेली सुमारे ३ हजार ६८ एकर जागा सुचविण्यात आली आहे. (Purandar Airport Baramati Village Land Survey)

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव परिसरातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयासह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या. मात्र या सातही गावांतील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी पर्यायी जागांचा विचार करावा, अशा सूचना मध्यंतरी प्रशासनाला दिल्या होत्या.

हेही वाचा: बारामतीत आता प्रशासनच लोकांकडे जाऊन करणार स्वॅब तपासणी

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार जगताप यांनी दिल्लीत जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सिंह यांनी देखील पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अगोदर निश्‍चित केलेल्या जागेपासून पूर्वेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यायी जागेचे सर्वेक्षण मध्यंतरी एका खासगी संस्थेकडून करून घेण्यात आले. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पाच गावांतील आणि बारामती तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. या आठ गावांतील मिळून ३ हजार ६८ एकर जागेवर विमानतळ उभारता येऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयास कळविण्यात आले आहे. ही सर्व जमीन जिराईत असून, संपादन करताना अडचण येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पर्यायी जागेचा विचार करताना पुण्यापासून विमानतळाचे अंतर दहा ते पंधरा किलोमीटरने वाढणार आहे. अगोदरचे अंतर ३० ते ३५ किलोमीटर आहे. ते ४५ ते ५० किलोपर्यंत जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !

अगोदर निश्‍चित केलेली गावे

-वनपुरी

-उदाची वाडी

-कुंभारवळण

-एखतपूर

-मुंजवडी

-खानवडी

-पारगाव

नव्या जागेचे फायदे

  • अगोदरपेक्षा जास्त जागा उपलब्ध होणार

  • विमानांचे लॅंडिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळा येणार नाही

  • लोहगाव विमानतळावरील उड्डाणांना कोणतीही अडचण नाही

  • अगोदरच्या जागेतील सात गावांतील बागायती क्षेत्र वाचणार

  • जिराईत क्षेत्र असल्याने नुकसान कमी

  • नव्याने विमानतळासाठी सुचविण्यात आलेली गावे

  • अंदाजे क्षेत्र : ७०० हेक्टर - भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द

  • अंदाजे क्षेत्र : २ हजार ३६८ हेक्टर - रिसे, पिसे, पांडेश्‍वर, राजुरी आणि नायगाव

  • ३ हजार ६८ हेक्टर - विमानतळासाठी आवश्‍यक क्षेत्र