
पुरंदर तालुक्यातील पुण्याचे नवीन प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ चुकिच्या जागेमुळे गेली ६ ते ७ वर्षे हवेत राहिला.
Purandar Airport : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची नवीन जागा आर्थिक, भौगोलिक, तांत्रिकदृष्ट्या चांगली
सासवड - पुरंदर तालुक्यातील पुण्याचे नवीन प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ चुकिच्या जागेमुळे गेली ६ ते ७ वर्षे हवेत राहिला. शासनाला नव्याने सुचविलेली जागा आर्थिक, भौगोलिक, तांत्रिकदृष्ट्या आणि पुढील दिडशे वर्षांचा विचार करून चांगली आणि योग्य असल्याचे निवृत्त हवाई दलाच्या अधिका-यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे., अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देत.. नव्याने सुचविलेल्या जागेला शासनाने मान्यता देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच विविध प्रश्नांबाबत लक्ष वेधत सदर मागणीच्या पुर्ततेसाठी शासनाकडून कार्यवाही करण्याची मागणी केली. गेली ७ ते ८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय पुरंदरमध्ये आला. त्याला स्थानिकांचा विरोध होता. याबाबत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, एअर ट्रॅफिक कंट्रोलर श्री जोशी आणि रॅफेलचे सारंग लोखंडे यांनी विमानतळासाठीच्या जागांचा अभ्यास केला.

Plane
त्यातून याबाबत शासनापुढे मांडणी केली. यामध्ये पहिल्या पेक्षा दुसरी जागा आर्थिक, भौगोलिक, तांत्रिकदृष्ट्या चांगली असल्याचे त्यांनी शासनाला सांगितल्याचे आ. संजय जगताप म्हणाले. तसेच या विमानातळामुळे पुणे परीसराचा मोठा विकास होणार असून पीएमआरडीएने विकास आराखडा करताना विमानतळाजवळ लाॅजिस्टिक पार्कच्या उभारणीची तरतूद करावी., अशी मागणीही यावेळी आ. जगताप यांनी केली.
हवेलीतील महापालिकेत समाविष्ट 15 गावांचाही प्रश्न मांडला
पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील हवेलीतील १५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून अमृत २ मधून पाणी योजना करावी. या गावांचा समावेश अडिच वर्षांपूर्वी मनपा हद्दीत झाला असूनही अद्यापही पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीज अशा मूलभूत सुविधांपासून येथील नागरीकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका तसेच पीएमआरडीए चा विकास आराखडा होताना नियोजनबद्ध आणि कालबद्धपणे आराखडा होऊन या भागाचा विकास व्हावा तसेच विकास आराखडा करताना येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुचना विचारात घेऊन त्या विकास आराखड्यात अंतर्भूत करण्याची मागणी आमदार संजय जगताप यांनी केली.
तसेच विकास आराखडय़ाला गती देणे आवश्यक असून यामुळे सातारा आणि सोलापूर महामार्ग या रिंगरोडमुळे जोडले जातील आणि या रिंगरोड परीसरात मार्केट कमिटी, कृषी विद्यापीठ, विविध शासकीय कार्यालये येऊन या परीसराचा विकास होण्यास मदत होईल असेही आमदार संजय जगताप यांनी मागणीत प्रतिपादन केले.