Pune : 'शुद्ध पिण्याचे पाणी, वस्ती पातळीवर समुपदेशन केंद्रे उभारावीत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

'शुद्ध पिण्याचे पाणी, वस्ती पातळीवर समुपदेशन केंद्रे उभारावीत'

पुणे : शुद्ध पिण्याचे पाणी २४ तास मिळावे, वस्ती पातळीवर मोफत रुग्णवाहिका आणि फिरता दवाखाना हवा, मुलांसाठी योग आणि व्यायामशाळा हव्यात, मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी वस्ती पातळीवर समुपदेशन केंद्रे उभरावीत, वस्तीमधील दारूची दुकाने बंद करावीत, अशा बालकांच्या मागण्यांचा समावेश असणारा जाहीरनामा बालहक्क कृती समितीने प्रकाशित केला आहे.

जागतिक बालहक्क दिनाचे औचित्य साधून बालहक्क कृती समितीतर्फे (आर्क) शहरातील विविध वस्त्यांमधील मुलांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणाऱ्या मागण्यांचा हा जाहीरनामा शनिवार पत्रकार परिषदेद्वारे प्रकाशित केला. यावेळी समितीचे संयोजक मंदार शिंदे, सहसंयोजक डॉ. विष्णू श्रीमंगले, अतुल भालेराव, सुशांत आशा यांसह अन्य समितीशी संलग्न युवक उपस्थित होते. या जाहीरनाम्यात मुलांचे शिक्षण, आरोग्य, मनोरंजन तसेच संरक्षण यासंदर्भात विविध मागण्यांचा समावेश आहे. या जाहीरनामा निर्मिती प्रक्रियेमध्ये सिंहगड, हडपसर, खराडी अशा विविध भागातील जवळपास १०० मुले सहभागी झाली होती.

बालकांच्या मागण्यांच्या या जाहीरनाम्यातील मागण्यांचा समावेश महापालिका निवडणूक २०२२ मधील इच्छुक नगरसेवकांनी आणि राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात करावा, यासाठी समितीतर्फे प्रयत्न केले जातील, असे सुशांत आशा यांनी सांगितले.

जाहीरनाम्यातील बालकांच्या प्रमुख मागण्या :

  1. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहतूक नियंत्रण गट कार्यन्वित हवा

  2. मुलींना शाळेत कराटे प्रशिक्षण द्यावे

  3. ठिकठिकाणी बाल सुरक्षा जनजागृती केंद्र असावीत

  4. बालकांच्या सुरक्षिततेच्या हेल्पलाइन सर्व ठिकाणी उपलब्ध कराव्यात

  5. रस्त्यावरील मुलांचे सामाजिक आणि शैक्षणिक पुनर्वसन करावे

  6. वस्त्यांमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे वर्ग सुरू करावेत

  7. प्रत्येक रुग्णालयात मोफत समुपदेशक व मानसोपचार तज्ञ असावेत

loading image
go to top