क्‍यूआर कोडवर मिळेना ई-कंटेंट

संतोष शाळिग्राम 
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे - विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास सोपा होण्यासाठी ई-कंटेंट देण्याचा गाजावाजा शालेय शिक्षण विभागाने केला. त्यासाठी पाठ्यपुस्तकांवर क्‍यूआर कोडही छापण्यात आले; परंतु दहावीची परीक्षा आली, तरीही ई-कंटेंट उपलब्ध नाही. मराठी वगळता इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू माध्यमांचे काम पूर्ण झाले नसल्याने पुस्तकातील कोड स्कॅन करून शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याचे चित्र आहे. 

पुणे - विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास सोपा होण्यासाठी ई-कंटेंट देण्याचा गाजावाजा शालेय शिक्षण विभागाने केला. त्यासाठी पाठ्यपुस्तकांवर क्‍यूआर कोडही छापण्यात आले; परंतु दहावीची परीक्षा आली, तरीही ई-कंटेंट उपलब्ध नाही. मराठी वगळता इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू माध्यमांचे काम पूर्ण झाले नसल्याने पुस्तकातील कोड स्कॅन करून शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याचे चित्र आहे. 

पाठ्यपुस्तकांतील धड्यांवर आधारित व्हिडिओ, तज्ज्ञांची व्याख्याने, विज्ञानाचे प्रयोग हे क्‍यूआर कोडमधील लिंकद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार होते. त्यासाठी १३ हजार क्‍यूआर कोड तयार करण्यात आले. हे सर्व शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी सहयोगी संस्थांची निवड करण्यात आली. त्यात पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी आणि राज्य सरकारची विद्या परिषद आहे. परिषदेने विषय शिक्षकांच्या माध्यमातून साहित्य निर्मिती करण्यास सुरवात केली.

काही विषयांचे ‘ई-कंटेंट’ अपलोड करण्यात आले. केवळ मराठी माध्यमाचे काम पूर्ण झाले असून, इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू माध्यमाचे काम पूर्ण झालेले नाही.

विद्यार्थी पाठ्यपुस्तकांतील क्‍यूआर कोड स्कॅन करून हे साहित्य मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यावर कोणतेही शैक्षणिक साहित्य मिळत नाही, अशी तक्रार पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही करीत आहेत. दहावीच्या कृतिपत्रिकेमध्ये या ई-कंटेंटवर प्रश्‍न येणार आहेत; परंतु क्‍यूआर कोडवर काहीच नसल्याचे या प्रश्‍नांचे गुण मिळणार नाहीत, अशी चिंता विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.    

याविषयी विद्या परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर म्हणाले, ‘‘दहावीचा क्‍यूआर कोडद्वारे मिळणारा ई-कंटेंट तयार आहे; परंतु तो अपलोड करण्याचे काम एक स्टेप ही संस्था करीत आहेत. मराठीचा ई-कंटेंट अपलोड झाला आहे मात्र, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचा राहिला आहे.’’

विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून ई-कंटेंट आहे. त्यावर परीक्षेला प्रश्‍न येणार नाहीत. परीक्षेतील प्रश्‍न हे पाठ्यपुस्तकावर आधारित असतील.
- डॉ. सुनील मगर, संचालक, विद्या परिषद

‘दीक्षा’ ॲपवर विज्ञान
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानप्रबोधिनीने तयार केलेल्या विज्ञान भाग एक आणि दोन या विषयातील प्रयोगाचे व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी पुस्तकातील क्‍यूआर कोडवर उपलब्ध झाले आहेत. भूगोल या विषयाच्याही इंग्रजी आणि मराठी माध्यमातील सर्व पाठांचे काम पूर्ण झाले आहे, असे ज्ञानप्रबोधिनीच्या प्रकल्प प्रमुख पल्लवी पराडकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या दीक्षा या प्रकल्पामध्ये सहयोगी संस्था म्हणून ज्ञानप्रबोधिनी काम करीत आहे. संस्थेने विद्या परिषद (एससीईआरटी) आणि बालभारती यांच्या सहयोगाने या साहित्याची निर्मिती केली आहे. दोनशेहून अधिक व्हिडिओ दीक्षा ॲप आणि www.diksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: QR Code E-Content