गुणवत्तापूर्ण संशोधनाचे विद्यापीठांसमोर आव्हान - डॉ. सत्यपाल सिंह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - 'देशात होणाऱ्या संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. केवळ पदोन्नतीसाठी प्राध्यापकांकडून संशोधन आणि शोधनिबंध प्रसिद्ध केले जातात, ही खेदाची बाब आहे. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती याचे दर्शन संशोधनातून घडले पाहिजे. गुणवत्तापूर्ण संशोधनाची मानसिकता निर्माण करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर आहे'', असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा 19 वा पदवीप्रदान समारंभ डॉ. सिंह यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्‍वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सात हजार 338 विद्यार्थ्यांना पदवी, 90 विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि 50 जणांना सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले.

डॉ. सिंह म्हणाले, 'विद्यापीठ स्तरावर होणारे संशोधन हे प्रयोगशाळांपुरतेच मर्यादित राहत आहे. विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन झाले पाहिजे. देशात पीएच.डी. संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे; पण संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.

आजही अनेकांना इच्छा असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी खासगी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.'' ते म्हणाले, 'पदवीप्रदान समारंभात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रमुख पाहुणे गाऊन घालतात. परंतु त्यावेळी गाऊन आणि टोपी घालणे योग्य आहे का, याचा विचार शैक्षणिक संस्थांनी करावा. देशातील अनेक विद्यापीठांनी या पद्धतीला बदलले आहे. त्यामुळे ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या विचारातून मुक्त करण्याची आवश्‍यकता आहे.'

कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. साळुंखे म्हणाले, 'संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे, या भावनेतून विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन केले आहे.'' सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र उत्तुरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.

Web Title: quality research bharti vidyapeeth satyapal singh