दंडवसुलीतून प्रश्‍न सुटणार नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

प्लॅस्टिक पिशव्यांबाबत किरकोळ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींचे मत
पुणे - प्लॅस्टिक पिशव्यामुक्त व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही; पण आधी पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. केवळ व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करून हा प्रश्‍न सुटणार नाही. नागरिकांमध्ये यासंदर्भात अधिक जनजागृती करणे आवश्‍यक आहे, अशा भावना किरकोळ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने गेल्या दोन तीन दिवसांपासून कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या पिशव्यांचा वापर करणाऱ्या किराणा भुसार मालाचे किरकोळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांकडून दंड वसूल केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन सदस्यांना केल्याचे पुणे जिल्हा रिटेलर असोसिएशनचे सचिन निवंगुणे यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘व्यवसायातील स्पर्धा आणि ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीमुळे या पिशव्यांचा वापर होतो. मॉलमध्ये जास्त जाडीच्या पिशव्यांतून माल ग्राहकाला दिला जातो. तेथे त्या पिशवीचे मूल्य ग्राहक देतो; पण किरकोळ विक्रेत्याने पिशवीचे पैसे मागितले तर त्याला ग्राहकांकडून काय प्रतिसाद दिला जातो, हे त्यालाच माहिती आहे.’’ ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी या पिशव्यांच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली.  

प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन थांबत नाही, ग्राहकही माल खरेदी केल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीची मागणी करतो, असे अनेक मुद्दे यामागे आहेत. पर्यावरण चांगले राहावे असे सगळ्यांना वाटते; पण निर्णयाच्या अंमलबजावणीचा फटका हा शेवटच्या घटकाला बसतो.
- सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ

Web Title: the question of fine recovery will not be solved